उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही ठिक आहे का असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची एक महत्वाची बैठक 'देवगिरी' बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती. या महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षांतर्गत वाद उघडपणे समोर आले आहेत. आगामी विधान परिषद निवडणूक, राज्यसभा उमेदवार आणि पक्षीय संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. मात्र, ज्येष्ठ नेत्यांमधील मतभेद आणि अंतर्गत गटबाजीमुळे ही बैठक चांगलीच वादळी ठरली. या बैठकीत सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ हे नेते एकमेकां समोर उभे ठाकले होते अशी माहिती सुत्रांनी दिली होती.
सुनील तटकरे आणि छगन भुजबल यांच्यात वाद
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबल यांच्यात बैठकीत वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षातील काही नेत्यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. या बद्दल तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याच बरोबर संकटकाळात आमदार किंवा सर्वोच्च नेतृत्व उघडपणे पाठीशी उभे राहत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर छगन भुजबल यांनी आक्षेप घेत पक्षाच्या अंतर्गत बैठकीत असे मुद्दे मांडण्याची गरज नव्हती, असे सुनावले. हा वाद सुरू असतानाच पार्थ पवार ही बैठक सोडून बाहेर पडले. त्यानंतर तटकरे यांचे भाषण होणार होते. मात्र तो पर्यंत पार्थ त्या बैठकीला थांबले नाहीत.
नक्की वाचा - VIDEO: तुम्ही कधी पांढरं हरीण पाहिलंय का? हा तर निसर्गाचा करिश्मा, थक्क करणारा VIDEO
प्रफुल्ल पटेल यांची अनुपस्थिती
या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित नव्हते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण उपस्थित राहू शकलो नाही आणि याची पूर्वकल्पना नेतृत्वाला दिली होती, असा खुलासा पटेल यांनी त्यानंतर केला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाला सादर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून तटकरे आणि पटेल यांची नावे गायब असल्याने आधीच संभ्रम निर्माण झाला होता, त्यातच या अनुपस्थितीमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्षाची सुत्रे सुनेत्रा पवार यांनी हातीत घेतल्यानंतर त्यांनी पक्ष संघटनेवर आपली पकड मजबूत केली आहे. हे करत असताना त्यांनी पक्षातील जेष्ठ नेत्यांचे पंख कापले आहेत. त्याचेच पडसाद देवगिरीवर झालेल्या बैठकीत दिसून आले.
सुनेत्रा पवार यांच्याकडे निर्णयाचे अधिकार?
बैठकीत रोहित पवार यांच्याकडून होणाऱ्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर देण्याची मागणी आमदारांनी केली आहे. तसेच विधान परिषद निवडणुकीच्या सर्व निर्णयांचे अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात यावेत, असा प्रस्ताव आमदारांनी मांडला. पक्षातून कोणताही आमदार फुटणार नाही, असा दावा नेत्यांनी केला असला, तरी देवगिरीवरील या घडामोडींनी राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे. या संपूर्ण स्थितीकडे सुनेत्रा पवार या शांत पणे पाहत होत्या. त्यांनी यात कोणताही हस्तक्षेप केला नाही असं ही सुत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.