शुभम बायस्कार
Amravati News : दर्यापूर येथील घाणीवाला उद्योग समूहाचे संचालक आणि अनेक वर्षांपासून ज्यांचे कुटुंबीय काँग्रेससोबत एकनिष्ठ होते, असे सलीमसेठ घाणीवाला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार राजेश वानखडे यांच्या उपस्थितीत त्यांचा थाटात पक्षप्रवेश झाला.
पंडित दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिलेल्या 'पथ अंतोदय प्रणअंतोदय' आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ सबका विकास' सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील विकसनशील महाराष्ट्र करण्यासाठी सलीमसेठ घाणीवाला यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब वानखडे, सरचिटणीस गोपाल चंदन, श्रीराम नेहर, मनीष कोरपे, गोकुळ भडांगे यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दर्यापूर नगरपरिषदेच्या माजी उपाध्यक्षा जुबेदाबाई घाणीवाला यांचे सलीम हे पुत्र असून त्यांचे वडील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जीकरभाई घाणीवाला हे अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ होते.
नक्की वाचा - Badlapur News : 'ED कारवाईचा वसई- विरार फॉर्म्युला बदलापुरात वापरणार', भाजपा आमदाराचा इशारा
मात्र सलीम घाणीवाला हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या विचारांनी प्रेरित होत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. संगणक अभियंता असलेल्या घाणीवाला हे आगामी काळात उद्योग, शिक्षण, अल्पसंख्यांकांचा विकास, मुस्लीम समाजातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न इत्यादी बाबींवर लक्ष देऊन काम करणार आहेत. घाणिवाला यांच्या प्रवेशामुळे दर्यापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आगामी काळात त्यांच्या नेतृत्वात या भागात अल्पसंख्यांकांचे मोठे संघटन भाजपकडून उभं केलं जाणार आहे. सोबतच त्यांना भाजपकडून मोठी जबाबदारी देखील मिळण्याची शक्यता आहे.