भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आतापर्यंत अनेक आरोप केले आहेत. शिवाय आपण त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणेही बाहेर काढल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी केलेल्या तक्रारी मुळे काही नेत्यांना जेल वारी करावी लागले आहे. तर काही जण बेलवर आहेत. विशेष करून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी लक्ष्य केलं होतं. त्यांनी त्यांचा मोर्चा आता समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याकडे वळवला आहे. त्यांनी आझमी यांच्याकडे एक दोन नाही तर चारशे कोटींची बेनामी मालमत्ता असल्याचा दावा केला आहे. याबाबतचे पुरावे ही दिले असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.
सोमय्यांचा दावा काय?
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याकडे चारशे कोटींची बेनामी मालमत्ता असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबई, भिवंडी आणि वाराणसीत ही मलामत्ता असल्याचेही सोमय्या यांचे म्हणणे आहे. याबाबत आपण ईडी, आयकर विभाग आणि मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे ते म्हणाले. शिवाय आपल्याकडे असलेले पुरावेही दिल्लीतील अधिकारी आणि मुंबई पोलिसांना दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र सोमय्या यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे हे चौकशीनंतर स्पष्ट होईल.
हेही वाचा - 'बारामतीत अजित पवारांना हरवणार, मग पक्ष सोडणार
कोण आहेत अबू आझमी?
अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत. शिवाय ते मानखुर्द विधानसभेचे आमदारही आहेत. मुंबईतमध्ये समाजवादी पक्षा वाढवण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. मुस्लिम समाजाचा एक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या बरोबर त्यांचे जवळचे संबध आहेत. अबू आझमी हे राज्य सभेचे खासदारही राहीले आहेत.
हेही वाचा - नांदेडमध्ये चिखलीकर मैदानात प्रतिष्ठा मात्र चव्हाणांची पणाला
राऊत परब, पेडणेकरांवर आरोप
किरीट सोमय्या यांनी याआधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अनिल परब, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर ही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. संजय राऊत यांना जेलची वारी करावी लागली होती. शिवाय सोमय्या यांनी या आधी अजित पवार, विजयकुमार गावित, नारायण राणे, भावना गवळी यांच्यावरही आरोप केले होते. मात्र ही मंडळी भाजपच्या जवळ आल्यानंतर त्या आरोपांचे पुढे काहीच झाले नाही. किंवा सोमय्या यांनीही त्यांच्या भ्रष्टाचाराचे विषय लावून धरले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विश्वासहर्तेवरही अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
हेही वाचा - प्रियांका गांधींच्या टीममधील नेत्याची कोल्हापुरात बंडखोरी, रडत-रडत भरला अर्ज