सांगलीत भाजपला मोठा धक्का, विलासराव जगतापांचा राजीनामा; विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर

सांगली लोकसभा मतदारसंघातील वाद दिवसेंदिवस वाढत असून अद्यापही कोणामध्ये लढत होणार हे निश्चित झालेलं नाही. दरम्यान सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना जबर धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
सांगली:

सांगली लोकसभा मतदारसंघातील वाद दिवसेंदिवस वाढत असून अद्यापही कोणामध्ये लढत होणार हे निश्चित झालेलं नाही. दरम्यान सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना जबर धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप सुरुवातीपासून संजय काकांचा विरोध करीत होते. आता त्यांनी थेट पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसच्या विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे विशाल पाटलांचं पारडं जड झालं आहे. मात्र भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जगताप यांच्यासह तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत, युवा मोर्चाचे जिल्हा नेते संग्राम भैय्या जगताप, जत शहराध्यक्ष अण्णा भिसे, राजू डफळे, लक्ष्मण बोराडे, राजू चौगुले आदींनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत.

दरम्यान विलासराव जगताप यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर दुष्काळी फोरम दोन दिवसात विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय दिसेल असा ठाम दावा देखील केला आहे. विशाल पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असेही ते यावेळी म्हणाले. संजय काका पाटील राजकारणातील गद्दार असल्याचं जगतापांनी जाहीरपणे समर्थक कार्यकर्त्यांसमोर म्हणाले. जगताप यांच्या निर्णयानंतर सांगली लोकसभेसाठी आता चांगलीच चूरस वाढली आहे.खासदार संजय काका व विलासराव जगताप यांच्यातील मतभेद गेल्या काही वर्षापासून टोकावर होते. खासदार संजयकाका पाटील यांनीच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत जगताप यांना अंतर्गत धक्का दिल्याचा आरोप जगताप गटाने त्यांच्यावर केला होता. त्यामुळे या दोघांमध्ये मतैक्य होण्याऐवजी ही दरी वाढतच गेली. त्याचे पडसाद आता लोकसभेच्या या निवडणुकीत दिसून येत आहेत.

Advertisement

हेही वाचा- धुळ्यात होणार तिरंगी लढत, माजी भाजपा आमदारची रिंगणात एन्ट्री

जगतापांच्या राजीनाम्याचं कारण काय? 
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून गटबाजी आणि अवमूल्यन केल्यानं राजीनामा दिल्याचं जगताप यांनी सांगितलं. त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं की, भारतीय जनता पार्टीमध्ये मी आजपर्यंत पक्षवाढीसाठी काम केलं आहे. परंतु पक्षाने त्याची दखल न घेता अलीकडे माझ्या विरोधात गट बांधण्याचं व माझं अवमूल्यन करण्याचं काम वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आलं आहे. ते मला सहन करणे शक्य नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी मी पक्ष्याच्या जबाबदारीतुन मुक्त होतो.

Advertisement