धुळे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांपुढं नवं आव्हान उभं राहिलंय. भाजपानं इथून विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनं माजी मंत्री शोभा बच्छाव यांना रिंगणात उतरवलंय. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील एका गटात नाराजीचं वातावरण आहे. या दोन्ही गटातील नाराजांना एकत्र करुन नवीन आघाडीसाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
कोण आहेत गोटे?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ अनिल गोटे सक्रीय आहेत. 1999 साली ते सर्वप्रथम धुळ्यातून आमदार झाले होते. अब्दुल करिम तेलगी घोटाळ्यात त्यांना चार वर्ष जेलमध्ये राहावं लागलं होतं. 2007 मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका झाली. गोटे यांच्यावरील याबाबतचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.
धुळ्यात काँग्रेसची 'शोभा', 'परत जा' च्या घोषणांसह कार्यकर्त्यांचा राडा
2007 साली तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2009 आणि 2014 साली ते भाजपाच्या तिकिटावर धुळे शहरातून निवडून आले. 2019 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपाला रामराम केला. त्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विजयी होता आलं नाही. AIMIM पक्षाच्या शाह फारुक अन्वर यांनी त्यांचा पराभव केला. धुळे शहरात सर्वच पक्षात गोटे यांचा मित्रपरिवार आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यास ही लढत तिरंगी होईल. गोटे कोणत्या पक्षाची मतं खेचतात त्यावर या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world