लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सांगलीत येत आहे. स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडतोय. त्यासाठी राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र ते या कार्यक्रमाला येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. जवळपास दिड लाख लोक बसतील ऐवढ्या भव्य मंडपाची व्यवस्था सांगलीच्या कडेगावमध्ये करण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असेल.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगलीच्या कडेगावमध्ये गुरूवारी 5 सप्टेबरला राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडतोय. मात्र या सोहळ्याला महाविकास आघाडीतील नेते शिवसेना गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रणपत्रिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?
याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधी हे सांगलीत येणार आहेत. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे असे पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र त्याच दिवशी इतर ठिकाणी कार्यक्रम असल्याचे ठाकरे यांना येता येणार नाही असेही पटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे एकीकडे राहुल गांधी शरद पवार हे मविआमधील बडे नेते एकत्र येत असताना उद्धव ठाकरे मात्र त्या ठिकाणी नसतील. त्यामुळे मविआमध्ये नक्की काय सुरू आहे याचीही चर्चा सुरू झाली आहे.
ट्रेंडिंग बातमी - जागा एक इच्छुक अनेक! पुरंदर विधानसभेची लढत गाजणार?
सांगली लोकसभा मतदार संघातला उमेदवार उद्धव ठाकरे यांनी परस्पर जाहीर केला होता. त्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत या मतदार संघातून विजय मिळवला होता. तेव्हापासून विशाल पाटील असो की विश्वजित कदम असोत ठाकरे त्यांच्यावर नाराज होते. त्यानंतर कदम आणि पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्या भेटीत सर्व विवाद मिटल्याचे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र काम करण्याचं ठरलं असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते. त्यामुळे सांगलीत होत असलेल्या या कार्यक्रमात उद्धव ठाकरे येतील अशी अपेक्षा होती. पण त्यांच्या अनुपस्थितीमुळे उद्धव ठाकरे यांच्या मनातील राग अजून गेला नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.