रामराजे शिंदे
Sanjay Raut's Letter to Congress High Command : 'महाविकास आघाडी'मध्ये (MVA) राज ठाकरे यांचा पक्ष मनसेच्या समावेशावरून मोठे राजकीय नाट्य रंगले असून, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत यांनी थेट काँग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींना पत्र लिहिल्याने आघाडीतील तणाव शिगेला पोहोचला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात ही तक्रार असल्यामुळे काँग्रेस श्रेष्ठी राऊतांवर कमालीचे नाराज झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस श्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे, त्यामुळे मनसेच्या समावेशावरून 'आघाडी'त कधीही दुरुस्त न होणारी बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नक्की वाचा: महापालिका निवडणुका पुढे ढकलणार? ठाकरे बंधू काय म्हणाले?
राज्यातल्या नेत्यांकडे दुर्लक्ष करत काँग्रेसश्रेष्ठींना पत्र
संजय राऊत यांनी काँग्रेस श्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तक्रार केली आहे. सपकाळ यांचा मनसेला 'महाविकास आघाडी'त घेण्यास तीव्र विरोध आहे. हा विरोध त्यांनी राऊत यांच्याकडेही स्पष्टपणे व्यक्त केला होता. विशेष म्हणजे, हर्षवर्धन सपकाळ यांनी राऊत यांना पत्र लिहून 'राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करून कळवतो,' असे सांगितले असतानाही, राऊत यांनी थेट दिल्ली दरबारी पत्र लिहून तक्रार केल्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्षांना विश्वासात न घेता थेट श्रेष्ठींकडे तक्रार करणे, ही कृती योग्य नससल्याचे काँग्रेस श्रेष्ठींचे मत आहे.
राज ठाकरे मविआत नकोच! काँग्रेसची स्पष्ट भूमिका
राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचे अथवा नाही याबद्दल काँग्रेस श्रेष्ठींची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. राज ठाकरे यांच्या संदर्भात महाविकास आघाडीत कुठलीही चर्चा अद्यापर्यंत झालेली नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे श्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसने राज ठाकरे यांना मविआत घेण्याला आधीपासून विरोध केला असून हा विरोध आजही कायम आहे. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये घेतल्यास, उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार महाविकास आघाडीपासूनदुरावतील. हे मतदार काँग्रेसचे पारंपरिक आधारस्तंभ मानले जातात. हा मतदार दूर करणे काँग्रेसला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परवडणारे नाही.
नक्की वाचा: निवडणूक आयोगाचा सर्व्हर कुणीतरी दुसरं चालवतंय, आम्हाला संशय आहे: जयंत पाटील
काँग्रेसचा हर्षवर्धन सपकाळ यांना पाठिंबा
संजय राऊत यांच्या पत्रावर नाराजी व्यक्त करतानाच, काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. सपकाळ यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाच्या धोरणांशी आणि भविष्यातील राजकीय गणितांशी सुसंगत असल्याचे श्रेष्ठींचे मत आहे. या सर्व घडामोडींमुळे 'महाविकास आघाडी'तील दोन प्रमुख पक्षांमध्ये मोठे मतभेद उघड झाले असून, मनसेच्या समावेशाचा मुद्दा आघाडीसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.