संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढत आहे. अजित पवारांनाही त्यासाठी गळ घातली जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही या प्रकरणी भेटले होते. त्यावेळी मुंडे राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. तशा राजकीय वर्तूळात चर्चाही होत होत्या. त्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुर्णविराम दिले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत त्यांनी स्पष्ट भूमीका मांडली आहे. शिवाय काही प्रश्न ही उपस्थित केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहे. संतोष देशमुख हत्ये प्रकरणी एसआयटी नेमण्यात आली आहे. सीआयडी मार्फत ही चौकशी सुरू आहे. तर न्यायालयीन चौकशी केली जात आहे. त्यामुळे तीन-तीन यंत्रणा यात चौकशी करत आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी जर कोणी दोषी असेल. त्याच्या वरील गुन्हा सिद्ध झाला तर त्याला सोडलं जाणार नाही अशी भूमीका मांडली आहे. आपण ही या प्रकरणी फडणवीसांची भेट घेतली होती. या प्रकरणात पक्ष वैगरे पाहू नका. यात जर मोठ्या पदावर काम करणारी व्यक्ती जरी अडकली असेल तरी त्याच्यावर कारवाई करण्यात गय करू नका असं सांगितलं आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिला आहे.
या हत्येतील गुन्हेगार सापडायला वेळ लागला. मात्र या काळात कोण कोण फोनच्या माध्यमातून संपर्कात होते. त्यांच्यात काय संभाषण झालं? याची माहिती घेतली जात आहे. ती माहिती तपासातही पुढे येत आहे. सरकारनेही या संपूर्ण प्रकरणात गांभीर्याने लक्ष दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशा प्रकारच्या हत्या कधीच खपून घेतल्या जाणार नाहीत असंही अजित पवार यांनी स्पष्ट पणे सांगितलं. दरम्यान विरोधी पक्षातील नेते काही वक्तव्य करत आहे. शिवाय सत्ताधारी पक्षातील नेतेही याबाबत बोलत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर ते त्यांनी तपास यंत्रणांकडे देणे गरजेचे आहे असं अजित पवार म्हणाले.
आरोप करताना कोणावर अन्याय होवू नये याची ही आरोप करणाऱ्यांनी खबरदारी घेतली पाहीजे असंही ते म्हणाले. जो दोषी असेल त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. सुरेश धस आरोप करत आहे. पण पुरावे नसतील तर आरोप करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनी करत धनंजय मुंडे यांची एक प्रकार पाठराखण त्यांनी केली. यात आम्हाला राजकारण येवू द्यायचे नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं. पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही या मुळ प्रश्नाला अजित पवारांनी बगल दिली. त्यामुळे सध्या तरी धनंजय मुंडे यांना अभय दिला आहे याचेच संकेत अजित पवारांनी यातून दिले आहेत.