Udayanraje on Sharad Pawar : राज्यात गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याची मागणी करत गेली वर्षभर आंदोलन केलं आहे. जरांगे पाटील यांनी या प्रश्नावर सातत्यानं भारतीय जनता पार्टी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. तर विरोधी पक्षानंही या प्रकरणात महायुतीला लक्ष्य केलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आगामी विधानसभा निवडणुकीत गाजणार हे निश्चित झालंय. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलंय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पवारांवर डागली तोफ
उदयनराजे यांनी साताऱ्यात पत्रकारांनी बोलताना शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला. 'पवारांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले, तसेच केंद्रात महत्त्वाच्या पदांवर काम केले, तरीही त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? ' असा सवाल त्यांनी केला.
शरद पवार यांनी 1994 साली काढलेल्या अधिसूचनेमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे दरवाजे कायमस्वरूपी बंद झाले, असा दावा उदयनराजे यांनी केला. पवारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्यामुळे मराठा समाज आज या परिस्थितीत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
( नक्की वाचा : 'शरद पवार दुबईत दाऊदला भेटले', जुना संदर्भ देत प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप )
पवार विरोधात असतानाच आंदोलनं कशी?
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षणावर सुरु असलेल्या आंदोलनावर उदयनराजे यांनी प्रश्न उपस्थित केले. “तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करत आहात की तयार करण्यासाठी? आंदोलन हे समाजाच्या भल्यासाठी असते, परंतु इथे राजकीय फायदा साधण्याचे प्रयत्न होत आहेत,' असे त्यांनी सांगितले.
पवार सत्तेत असताना ही आंदोलने होत नव्हती, मात्र पवार विरोधात जाताच ही आंदोलने कशी सुरू होतात? याचा समाजाने देखील विचार करावा, असं मत उदयनराजे यांनी व्यक्त केलं.
महायुती सरकारने राज्यात अनेक विकासकामे मार्गी लागली असून, आगामी निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळेल. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण राज्यभर फिरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपले बंधू, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारासाठी देखील आपण गावोगावी जाणार असून, त्यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला.