मोसिन शेख, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar News : महायुतीचा ‘विचित्र' खेळ आणि राजकारणात नवा पॅटर्न छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. राज्याच्या राजकारणात सध्या महायुतीचे वारे वाहत असले, तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये ‘अजब-गजब' युती पाहायला मिळत आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असताना दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या हक्काच्या जागांवर एबी फॉर्म दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा महायुतीचा 'सर्जिकल स्ट्राईक' आहे की अंतर्गत गटबाजी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, काही जागांवर हे दोन्ही पक्ष हातात हात घालून प्रचार करतील, तर काही जागांवर एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकताना दिसणार आहेत.
२७-२५ चा फॉर्म्युला आणि सत्तारांचा 'खो'
या संपूर्ण गोंधळावर राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सावे यांच्या म्हणण्यानुसार, भाजप आणि शिवसेना यांच्यात २७ (भाजप) आणि २५ (शिवसेना) असा जागावाटपाचा स्पष्ट फॉर्म्युला ठरला होता. यावर दोन्ही बाजूंच्या सह्या देखील झाल्या होत्या. मात्र, आमदार अब्दुल सत्तार यांनी या फॉर्म्युलाला नकार दिल्याने सिल्लोडमधील ११ जागांवर 'मैत्रीपूर्ण' लढत देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण हा गोंधळ केवळ सिल्लोडपुरता मर्यादित राहिलेला नाही.]
नाईलाजास्तव भाजपचा प्रति-हल्ला
अतुल सावे यांनी स्पष्ट केलं की, ज्या ठिकाणी युती निश्चित झाली होती, तिथेही शिवसेनेने अचानक आपले एबी फॉर्म दिले. "आम्हाला कुठेही बंडखोरी करायची नव्हती, म्हणून आम्ही सुरुवातीला एबी फॉर्म दिले नव्हते. मात्र, शिवसेनेने मित्रधर्माच्या पलीकडे जाऊन ११ जागांवर उमेदवार उभे केल्यावर आम्हाला नाईलाजास्तव ५ ठिकाणी आपले एबी फॉर्म द्यावे लागले," असे सावे म्हणाले. शिवसेनेने भाजपच्या वाट्यातील ११ जागांवर दावा ठोकला आहे, तर प्रत्युत्तर म्हणून भाजपने शिवसेनेच्या ५ जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत.
प्रचाराचा वेगळाच पॅटर्न
आता छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचाराचा एक वेगळाच पॅटर्न पाहायला मिळणार आहे. जिथे युतीचे उमेदवार अधिकृत आहेत, तिथे भाजप-शिवसेना एकत्र मते मागतील. मात्र, जिथे 'मैत्रीपूर्ण' लढत आहे, तिथे एकमेकांचे उट्टे काढले जातील. "युती नाही असे म्हणता येणार नाही, पण परिस्थितीनुसार आम्हाला आता रणनीती बदलावी लागेल," असे सूचक विधान सावे यांनी केलं आहे. या अंतर्गत कलहाचा फायदा महाविकास आघाडीला होणार की महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.