दिवाकर माने
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेते इकडे तिकडे गेले. काहींना शरद पवारांना साथ दिली तर काहींनी अजित पवारांना आपलसं केलं. अशात आता शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे बडेनेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 8 तारखेला ते पक्षात प्रवेश करतील. त्यांच्या प्रवेशाने अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांना साथ देण्याचे ठरवले होते. मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला होता. त्यानंतर दुर्राणी यांनी अजित पवारांची साथ सोडली. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र विधानसभेला त्यांना पाथरी मतदार संघातून उमेदवारी हवी होती. पण ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला.
परभणीच्या पाथरी तालुक्याचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या कार्यक्रमात त्यांनी घोषणा केली आहे की लवकरच ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहेत. त्यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही अजून बळकट होईल असं दुर्राणी यावेळी म्हणाले. शिवाय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले. कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही असं ही त्यांनी यावेळी सांगितलं.
येत्या आठ तारखेला पाथरी येथे हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. बाबाजानी दुर्राणी यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांनी पाथरी मतदार संघाचे तिन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. शिवाय ते विधान परिषदेवरही निवडून गेले होते. त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्याचा थेट फायदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या जाण्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मात्र नुकसान होणार आहे. मराठवाड्यातील हक्काचा चेहरा शरद पवारांपासून दुर गेला आहे.