राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिक येथे 14 सप्टेंबर रोजी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 15 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर पक्षाच्यावतीने महामोर्चा नाशिक मध्ये काढण्यात येणार आहे. या शिबिराला आणि महामोर्चाला राज्यसह देशातील सर्व राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
यावेळी शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, पक्षाची आज राज्य कार्यकारिणीची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना मजबुत करण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या हक्कासाठी विविध विषयांवर आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. जनसुरक्षा कायदा, निवडणूक आयोग मत चोरी यासह शेतकऱ्यांचे प्रश्नांसह राज्यस्तरीय विषयांवर आंदोलन घेण्यासंदर्भात ,शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच तूर, मूग, कांदा यांना सरकारने दिलेला हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या हमीभावाप्रमाणे तत्काळ खरेदी करावे तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची देखील अंमलबजावणी करण्यात यावी यासह अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर या आंदोलनात सरकारला जाब विचारण्यात येईल.
राष्ट्रवादीच्या वतीने नाशिक येथे पक्षाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर 14 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. नाशिक मध्ये 15 सप्टेंबर रोजी सभेच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर महामोर्चा काढण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. या महामोर्चात अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ जाहीर करा, निवडणूक आयोग, प्रीपेड मीटर, शेतकऱ्यांवर निर्बंध लावण्याचा प्रयत्न असेल अशा अनेक प्रश्नांविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष शिबिराचा समारोप मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येईल. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील आणि देशातील सर्वच नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार आहेत. यानंतर भविष्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे आंदोलन जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवर देखील करणार आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे.