काँग्रेसमधील नाराज नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल (Piyush Goyal) यांच्यासोबत सेल्फी काढल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. भारत-ब्रिटन व्यापार चर्चेनंतर हा सेल्फी घेण्यात आला आहे. त्यामध्ये शशी थरुर यांच्यासोबत केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि ब्रिटनचे व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स दिसत आहे. या फोटोनंतर थरुर यांच्या काँग्रेसमधील भविष्याबाबत प्रश्न विचारले जात आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत ब्रिटनचे (युके) व्यवसाय आणि व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांच्याशी संवाद साधताना आनंद झाला. प्रदीर्घ काळ रखडलेली एफटीए वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या आहेत, हे अतिशय स्वागतर्ह आहे,' असं ट्विट थरुर यांनी केलं आहे.
काँग्रेससोबत बिघडले संबंध
शशी थरुर यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवरील एका पोस्टमध्ये केरळ सरकारच्या धोरणांची प्रशंसा केली होती. त्यानंतर थरुर आणि पक्षातील संबंध ताणले गेले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा पक्षातील त्यांच्या भविष्याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
शशी थरुर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती. पक्षात दुर्लक्ष केल्यानं थरुर नाराज आहेत. आपल्याजवळ अन्य पर्याय नाहीत, असं काँग्रेस पक्षानं समजू नये, असं थरुर यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे.
( नक्की वाचा : साहित्य संमेलनात दिसली PM मोदी - पवारांची केमेस्ट्री, स्टेजवरील प्रसंगाची सर्वत्र चर्चा, पाहा Video )
काय आहे वाद?
केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युनायटेड डेमॉक्रेटीक फ्रंट मुख्य विरोधी पक्ष आहे. थरुर यांनी राज्याच्या विकासाबाबत बोलताना काही सकारात्मक वक्तव्य केलं होतं. काँग्रेस पक्षाचं स्थानिक वृत्तपत्र वीक्षणम डेलीनं या विषयावर थरुर यांच्यावर टीका केली होती. आपण माकपची प्रशंसा केली नव्हती. फक्त स्टार्टअप क्षेत्रातील केरळची प्रगती सांगण्याचा प्रयत्न केला होता, असं थरुर यांनी नंतर स्पष्ट केलं.