काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा असे विधान केले आहे, त्यामुळे काँग्रेसची कोंडी होण्याची पुन्हा एकदा शक्यता आहे. थरूर यांनी आणीबाणीचा (Emergency) निषेध केला आहे. शिवाय आणीबाणी भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शशी थरूर म्हणाले की, स्वातंत्र्य कसे हिरावून घेतले जाते, हे 1975 मध्ये सर्वांनी पाहिले. पण आजचा भारत 1975 सालातला नाही. असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांचे कौतुक केले आहे. या आधी ही त्यांनी असं केलं आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर इतर देशांमध्ये भारताची बाजू मांडण्यासाठी जी खासदारांची टीम तयार करण्यात आली होती, त्यात काँग्रेस खासदार शशी थरूर यांचाही समावेश होता. शशी थरूर यांनी परदेशी भूमीवर मोदी सरकारला जोरदार पाठिंबा दिला होता.
शशी थरूर म्हणाले की, आणीबाणीला भारताच्या इतिहासातील केवळ एक काळा अध्याय म्हणून आठवले जाऊ नये, तर त्याचे धडे पूर्णपणे समजून घेतले पाहिजेत. गुरुवारी मल्याळम दैनिक 'दीपिका'मध्ये आणीबाणीवर प्रकाशित झालेल्या एका लेखात थरूर यांनी 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधींनी घोषित केलेल्या आणीबाणीच्या काळाची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले की, शिस्त आणि व्यवस्थेसाठी केलेले प्रयत्न अनेकदा क्रूरतेच्या अशा कृत्यांमध्ये बदलले. त्यातून मात्र कुणालाही न्याय देता येत नाही असे वर्णन त्यांनी आणीबाणीचे केले आहे.
तिरुवनंतपुरमचे खासदार थरूर यांनी पुढे लिहिले की, "इंदिरा गांधींचा मुलगा संजय गांधी यांनी सक्तीने नसबंदी अभियान राबवले. ते आणीबाणी काळातले अतीशय वाईट उदाहरण होते. गरीब ग्रामीण भागात, मना प्रमाणे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी हिंसा आणि जबरदस्तीचा वापर केला गेला. नवी दिल्लीसारख्या शहरांमध्ये, झोपडपट्ट्या क्रूरपणे पाडल्या गेल्या. त्यामुळे हजारो लोक बेघर झाले. त्यांना कोणताही आधार दिला नाही. त्यांच्या कल्याणाकडे लक्ष दिले गेले नाही. असं थेट वक्तव्य थरूर यांनी या लेखातून केलं आहे.
लोकशाहीला कुणीही हलक्यात घेऊ नये. हा एक अनमोल वारसा आहे. त्याचे सातत्याने जतन आणि संरक्षण केले पाहिजे. असं ही थरूर या लेखात म्हणतात. लोकशाही ही लोकांसाठी आहे. ती सर्वांची प्रेरणा आहे. आजचा भारत 1975 चा भारत नाही. आज आपण अधिक आत्मविश्वास, अधिक विकसित आणि अनेक अर्थांनी अधिक मजबूत लोकशाही आहोत. तरीही आणीबाणीच्या घटनेतून आपण धडा शिकला पाहीजे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
थरूर यांनी इशारा दिला की, सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा, मतभेद दाबण्याचा आणि घटनात्मक सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष करण्याचा मोह अनेक रूपांत समोर येऊ शकतो. ते म्हणाले, "अनेकदा अशा प्रवृत्तींना राष्ट्रीय हित किंवा स्थिरतेच्या नावाखाली योग्य ठरवले जाते. या दृष्टीने आणीबाणी एक कठोर इशारा आहे. लोकशाहीच्या रक्षकांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे." असं ही त्यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.