विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता कमी आहे. त्यामुळे मंत्रीपद मिळेल या आशेवर असलेल्यांनी आता मंत्री होण्याची आशाही सोडली आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी कोट शिवून तयार ठेवणाऱ्या, मुख्यमंत्र्यांच्या खासमखास भरत गोगावलेंनीही आता मंत्रिपदाची आशा सोडली आहे. आता मंत्रिपद मिळालं काय, नाही मिळालं काय? आम्हाला त्याची अपेक्षा नाही असं वक्तव्य करत त्यांनी आपली नाराजी लपवली नाही. पण पुन्हा सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगत त्यांनी मंत्रिपदाच्या विषयालाच कलाटणी दिलीय. शिर्डीत ते आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळे. त्यानंतर शिंदे आणि फडणवीसांचे सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये मंत्री होण्याची संधी भरत गोगावलेंना होती. पुढच्या विस्तारात नक्की मंत्रिपद देणार असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. मंत्रिमंडळ विस्तार झाला पण त्यांना काही संधी मिळाली नाही. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी कोट शिवून तयार असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं. पण तो घालण्याची संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना कधी दिलीच नाही. आता निवडणुका तोंडावर आहेत. अशाच मंत्रिमंडळ विस्तार होईल याची आशा अंधूक आहेत. त्यामुळे गोगावले यांनीही आता काही मंत्री होत नाही याचे मन बनवले आहे.
ट्रेंडिंग बातमी - अजित पवार 'तसे' नाहीत, राज ठाकरेंनी सांगितला नेमका फरक
मंत्रिपद मिळालं किंवा नाही मिळालं, काही हरकत नाही. त्याची आता अपेक्षाही नाही. त्या वेळी आम्हाला संधी होती. पण आम्हाला थांबायला सांगितलं. आम्ही थांबलो. त्याबाबत पुन्हा कधी बोललो नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा म्हणून ओळखला जातो. आम्ही सांगतो ती कामे मुख्यमंत्री करतात. त्यामुळे मंत्री असलो काय, नसलो काय काही फरक पडत नाही अशा शब्दात भरत गोगावले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुन्हा सत्ता कशी येणार यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ती आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्रिपद नाही तर शिंदेंच्या जवळचे यावरच आता भरत गोगावलेंनी समाधान मानले असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
लोकसभेला जागा वाटप उशिरा झाले. त्याचा फटका महायुतीला बसला. मात्र विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप लवकर होईल असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला आहे. त्या बाबत चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे प्रभारी मतदार संघात जात आहेत. त्यांची चाचपणी सुरू आहे. त्यांचा रिपोर्ट लवकरच प्राप्त होईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी कोणाला द्यायची हा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याचेही ते म्हणाले. ही प्रक्रिया लवकर पुर्ण केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - सुपारी आंदोलन! 'होय ते आमचेच शिवसैनिक पण...' संजय राऊतांनी हात का झटकले?
यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली. बुडत्याचा पाय खोलात. असं ते विरोधकांना म्हणाले. सरकारने चांगली कामे केली आहेत. चांगल्या योजना आणल्या आहेत. असं पहिले कधीही झाले नव्हते. विकास कामं रेकॉर्डब्रेक झाली आहेत. त्यामुळे विरोधकांकडे आरोप करण्या शिवाय काही शिल्लक राहीलेले नाही. त्यांनी आरोप करावेत आम्ही काम करत राहू असेही त्यांनी सांगितले.