- मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात दंड थोपटले आहेत
- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रेमी युगुलांना सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्यास काठीने मारण्याची धमकी
- आंदोलनात व्हॅलेंटाईन डे विरोधात "मुर्दाबाद" अशा घोषणां देण्यात आल्या आहेत
जगभरात व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा करण्याची तयारी सुरू आहे. गेले काही दिवस व्हॅलेंटाईन विक साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनं व्हॅलेंटाईन डे ला आपला विरोध कायम ठेवला आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात याला कडाडून विरोध करण्यात येत आहे. स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी या पार्श्वभूमीवर काठी पूजन केले आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे असून, प्रेमी युगुलांना सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता न पसरवण्याची ताकीद देण्यात आली आहे.
शिवसेनेने या आंदोलनाला 'दंड पूजन' असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे, पंडित-पुरोहितांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात हे पूजन पार पडले. या पूजनावेळी काठ्यांना चमेली आणि मोहरीचे तेल लावून विधिवत पूजा करण्यात आली. या काठ्यांचा वापर शिस्त राखण्यासाठी केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. जर कोणी अश्लील चाळे करताना दिसले, तर त्याला तिथेच फटकवण्याची तयारी शिवसेनेनं केली आहे. त्याच बरोबर तिथल्या तिथ लग्न लावण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.
नक्की वाचा - Viral Video: व्हिडीओत दिसणारी ही खासदार कोण आहे ? दोघांमध्ये नेमकी काय बातचीत झाली ?
आंदोलनादरम्यान "जिथे मिळतील बाबू-सोना, तोडून टाकू कोना-कोना" आणि "लव्ह जिहादी व्हॅलेंटाईन डे मुर्दाबाद" अशा आशयाचे फलक हातात धरून निदर्शने करण्यात आली. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव भारतीय तरुण पिढीवर पडत असून त्याला रोखणे आवश्यक असल्याचे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी यावेळी नमूद केले. त्यासाठी शिवसेना काही करण्यासाठी तयार आहे असं ही त्यांनी सांगितलं. शिवाय व्हॅलेंटाईन डे तरुण आणि तरुणींनी साजरा करू नका असा दम ही त्यांनी भरला आहे. जर तसे करताना दिसलात तर त्याचे परिणाम भोगण्यासाठी तयार रहा असा इशारा ही देण्यात आला आहे.
शहरातल्या हॉटेल चालकांनाही याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. जर का कुठे हॉटेलमध्ये अश्लील कृत्य दिसली तर त्याचे परिणाम भोगण्यासाठी तयार रहा असा इशारा ही देण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत व्हॅलेंटाईन डे वरून मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. तर शिवसेनेनं घेतलेल्या या भूमीकेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ही निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी प्रशासन या आंदोलनाला कशा पद्धतीने हाताळणार हे पाहावे लागणार आहे. तर तरुण आणि तरुणी या दबावाला बळी पडणार की नाही हे ही उद्याच स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world