कोकणात विधानसभा निवडणुकीच्या तयारीने जोर धरला आहे. तळकोकणात म्हणजेच सिंधुदुर्गात तर सध्या निवडणुकी आधीच जोरदार धुमशान सुरू आहे. मतदार संघ आपल्यालाच मिळावा यासाठी महायुतीत ओढाताण सुरू आहे. तर महाविकास आघाडी जोरादर मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. राणे कुटुंबानेही नेहमी प्रमाणे शुड्डू ठोकला आहे. नारायण राणे यांनी मोठे चिरंजिव निलेश राणे यांना कुडाळ मालवण मतदार संघ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर विद्यमान आमदार नितेश राणे हे देवगड कणवकवीत ठाण मांडून आहेत. अशात आता कणकवलीत लागलेल्या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. शिवाय वेगवेगळ्या राजकीय चर्चाही त्यातून होत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून काही नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. आता या जागेसाठी हळूहळू रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे. कणकवली मतदार संघात एकीकडे भाजपाकडून नितेश राणे हे उमेदवार निश्चित आहेत. मात्र ठाकरे गटाचे उमेदवार कोण हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यातच सर्वांकडूनच उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक देखील झाली.
ट्रेंडिंग बातमी - 'अजित पवारांनी भ्रष्टाचारी वृत्तीची पिढी तयार केली' दादांचा खंदा समर्थक भडकला
या बैठकीत अंतिम निर्णय झाला नसला तरी काही जणांनी उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग केल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधत आहे. त्या बॅनरमध्ये 'तो येतोय! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी' असा मजकूर लिहीण्यात आला आहे. शिवाय त्याखाली मशाल चिन्ह ही दाखवणयात आलं आहे. त्यामुळे नक्की कोण येत आहे? शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी कोणाला? घराणेशाही नष्ट कोण करणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावर सध्या जोरदार चर्चा ही सुरू आहे.
सिंधुदुर्ग मतदार संघात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. त्यातील कणकवली कुडाळ मतदार संघात नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे हे आमदार आहेत. तर मालवण कुडाळ मधून मोठे चिरंजीव निलेश राणे यांना आमदार व्हायचे आहेत. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोघे जण निवडणूक रिंगणात असणार आहेत. अशा वेळी शिवसेना ठाकरे गटाने कोटी करत राणेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या विरोधात तगडे उमेदवार देणार असल्याचेच संकेत त्यांना या बॅनरच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे राणें विरोधात कोण याची उत्सुकता ताणली गेली आहे.