मनसेचा गुडीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. त्याची तयारी सगळीकडे सुरू आहे. मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी मनसेने केली आहे. त्यात मनसेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यातील काही बॅनरवर थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे फोटो झळकले आहेत. त्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या या कृतीवर शिवसेना ठाकरे गटाने टिका केली आहे. सर्वांना बाळासाहेबांचाच आधार घ्यावा लागतो. त्याला मनसेनेही उत्तर दिले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा वाद आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. बाळासाहेबांचा फोटो मनसेच्या बॅनरवर आल्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांच जुनं भाषण पुन्हा चर्चेत आलं आहे. हे भाषण 23 जानेवारी 2006 रोजी षण्मुखानंद सभागृहातलं आहे. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केल होतं. त्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. शिवाय त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष ही स्थापन केला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना आपला फोटो लावण्यास बंदी घातली होती. त्यावेळी त्या भाषणात ते काय बोलले होते त्यावर एक नजर टाकूयात.
बाळासाहेब राज यांनी उद्देशून म्हणाले होते, लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळलेल पोर, त्याला निक्षून सांगायचं आहे की शिवसेनेतून बाहेर पडला, सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलास, तू माझा बॅनरवर फोटो छापू नको असं थेट बाळासाहेबांनी सांगितलं होतं. तू शिवसेना सोडलीस. राजला मला एक नम्रपणे सांगायचा आहे. शिवसेना नेते पदाचा तू पहिला राजीनामा दिलास. शिवसेना सोडलीस. विद्यार्थी सेनेचा तू राजीनामा दिलास. शिवसेना सोडलीस तुला हे सुद्धा कटाक्षपणे पाळावं लागेल. नातं तुटलं नाही. असू द्या. लहानपणापासून अंगावर खेळलेल पोर त्याला निक्षून सांगायचं आहे की शिवसेनेतून बाहेर पडलास, सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलास, तू माझा बॅनरवर फोटो छापू नको असं बाळासाहेब म्हणाले होते.
त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या बॅनरवर कधीही बाळासाहेबांचा फोटो वापरला नाही. बाळासाहेबांचा फोटो वापरणे त्यांनी टाळले. मात्र ते आपल्या भाषणातून बाळासाहेबांचा नेहमी उल्लेख करायचे. पुढे शिवसेनेत मोठी फुट पडली. एकनाथ शिंदे हे पक्ष आणि चिन्ह बरोबर घेवून गेले. त्यावर त्यांनी बाळासाहेब ही आपल्या बरोबर असल्याचे सांगितले. शिंदे सेनेच्या बॅनरवर बाळासाहेब ठळकपणे दिसतात. त्यालाही उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता. पक्ष चोरला चिन्ह चोरलं आणि बाप ही चोरला अशी टीका त्यांनी केली होती. त्यात आता मनसेनेही बाळासाहेबांचा फोटा वापरला आहे. त्यामुळे ठाकरेंचे टेन्शन मात्र वाढले आहे.