रामराजे शिंदे
शिवसेना उबाठाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Delhi Tour) हे गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. या घडामोडींमुळे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या खासदारांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतर्फे (Shivsena Eknath Shinde) आयोजित करण्यात येणाऱ्या स्नेहभोजनाला (Dinner of Prataprao Jadho) जाऊ नये असे फर्मान जारी केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आदित्य ठाकरे यांचा दिल्ली दौरा सुरू होण्यापूर्वी स्नेहभोजनावरून बरंच नाट्य घडलं होतं. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी बुधवारी स्नेहभोजन ठेवलं होतं. या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश आष्टीकर यांनी या स्नेहभोजनाला हजेरी लावली होती. प्रतापराव जाधव हे केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत. मंत्र्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाण्यास हरकत काय आहे असा एक सूर ठाकरेंच्या खासदारांकडून ऐकायला मिळत होता. या स्नेहभोजनापूर्वी ठाकरेंचे आणखी एख खासदार संज दिना पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित होते.
नक्की वाचा : शिंदेंची खेळी, ठाकरे गटाला गळती! राजन साळवींच्या पक्षप्रवेशाआधी नाशिकमध्येही खिंडार
राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. ही बाब ठाकरेंच्या शिवसेनेला अजिबात आवडलेली नाही. हा सत्कार होत असतेवेळी देखील संजय दिना पाटील उपस्थित होते. याचाही राग ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना आल्याचे कळते आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रद्रोही आहेत, त्यांचा पवारांना सत्कार करणे योग्य नाही अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मांडली होती. आदित्य ठाकरे यांना या भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की संजय राऊत यांनी मांडलेली भूमिका हीच माझीही भूमिका आहे.
नक्की वाचा : 'शिवाजी महाराज नसते तर भारतात पाकिस्तान...', राज्यपाल राधाकृष्णन यांचे मोठे विधान!
स्नेहभोजनाला जाण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही!
आदित्य ठाकरे यांनी फर्मान जारी केल्याच्या काही मिनिटांमध्येच त्यांच्या आदेशांना हरताळ फासण्याची मानसिकता ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांची दिसून आली. 'प्रतापराव जाधव जुने सहकारी आहेत. त्यांच्याकडे स्नेहभोजनाला जाण्यासाठी पक्षाच्या परवानगीची गरज नाही.' अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी मांडली आहे. एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर राबविणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. याअंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि आमदार आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून खासदार दिल्लीमध्ये आहेत. 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चा सुरू असताना आदित्य ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांना सक्त ताकीद दिली. दिल्लीमध्ये हे नाट्य सुरू असताना इकडे महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. या निमित्ताने पत्रकार परिषद होणार असून त्यातून आणखी काही नव्या बाबी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येण्याची शक्यता आहे.