अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
गणेशोत्सव संपताच विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महायुती ही निवडणूक एकत्र लढवणार आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जागावाटपाची चर्चा सुरळीत सुरु असल्याचा दावा करत आहेत. त्याचवेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेते किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसला गंभीर इशारा दिला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
..... तर 288 जागा लढवू !
शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूरमध्ये महिला संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुंबईच्या माजी महापौर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संबोधित केले. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा जागांपैकी शिवसेना ठाकरे गट बल्लारपूर विधानसभा जागेसाठी आग्रही आहे. गेली 35 वर्षे या मतदारसंघातून काँग्रेसला सतत पराभवाचा सामना करावा लागतोय. त्याचा धागा पकडून जिल्हाप्रमुख संदीप गि-हे यांनी स्वतःसाठी या जागेची मागणी करत पक्षप्रमुखांकडे निरोप पोहोचवण्याचा आग्रह केला.
( नक्की वाचा : पुण्यात भाजपाला मोठा धक्का, 'या' नेत्यानं हाती घेतली तुतारी )
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना बैठकीमध्ये शिवसेनेसाठी जागा सोडाव्याच लागतील असं वक्तव्य केलं. हायुतीत असताना शिवसेनेला चंद्रपूर जिल्ह्यात जागा होत्या आता तर त्या खेचून आणूच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी काँग्रेस सर्व सहा विधानसभा जागा लढवणार आहे असे विधान केल्याचे लक्षात आणून देताच आम्ही चंद्रपूरच काय प्रसंगी 288 जागा लढवू असे पेडणेकर यांनी ठणकावून सांगितले.
वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांचा काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी पराभव केला. त्यानंतर मुनगंटीवार पुन्हा एकदा बल्लारपूरमधून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे.