
संविधानाचा अवमान झाल्या प्रकरणी परभणीमध्ये लोक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्या पैकी एक सोमनाथ सुर्यवंशी हे होते. चौकशी दरम्यान त्यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. मात्र त्यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला नाही. तर ह्रदविकाराने झाल्याचं सरकार तर्फे सांगितलं गेलं. मुख्यमंत्र्यांनीही विधानसभेत त्याबाबतची माहिती दिली. मात्र या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. सुर्यवंशी यांच्या भावाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी वेगवेगळ्या पक्षातले नेते जात आहे. सुर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत खून झाल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय पहिल्यापासून करत आहेत. सरकारने त्यांना मदतीची घोषणा ही केली होती. मात्र सुर्यवंशी कुटुंबीयांनी ही मदत ही नाकारली आहे. या कुटुंबाची वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांचे भाऊ प्रेमनाथ यांनी आतापर्यंत या प्रकरणात काय काय झालं हे आंबेडकर यांना सांगितलं.
मात्र त्यांनी पोलिस हे प्रकरण कशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी काय केलं हे प्रेमनाथ यांनी प्रकाश आंबेडकर यांना सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. सोमनाथ यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 50 लाख आणि सरकारी नोकरीचे आमिष दाखवले होते. असा गौप्यस्फोट सोमनाथ सुर्यवंशीचे भाऊ प्रेमनाथ यांनी केला आहे. सोमनाथ यांच्या मृत्यूनंतर आपल्याला गप्प बसण्याचा पोलिसांनी सल्ला दिला होता. असं ही त्यांनी आंबेडकरांशी बोलताना दावा केला.
प्रेमनाथ यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी जो दावा केला आहे त्यामुळे पोलिसां समोरील अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. अकोल्यातील कृषीनगर भागातल्या 'यशवंत भवन' या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांची आई, भाऊ, काका आणि मावशी उपस्थित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world