मनोज सातवी, प्रतिनिधी
महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीय मतदारांची मते पदरात पाडून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रचाराची खास आखणी केली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांचा राज्य आणि भाषानिहाय डेटा बँक तयार करून त्यानुसार प्रचाराची रणनीती आखली जात आहे. याचाच भाग म्हणून उत्तर भारतीयांची लक्षणीय लोकसंख्या असलेल्या नालासोपारा आणि वसई विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघात उत्तर भारतीय नेते आणि अभिनेत्यांच्या सभा आणि कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे.
नालासोपारा मतदार संघात भाजप नेते आणि भोजपुरी अभिनेते खासदार मनोज तिवारी यांचा जंगी रोड शो काढून 26 टक्के मतदार असलेल्या उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या रोड शो दरम्यान मिळालेल्या प्रतिसादामुळे आणि जमलेल्या गर्दीमुळे नालासोपाऱ्यात परिवर्तन होईल आणि राजन नाईक निवडून येतील असा विश्वास अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी यांनी व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे वसई मतदारसंघातील उमेदवार स्नेहा दुबे पंडित यांच्या प्रचारासाठी माजी केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 'माझं सासर पालघर जिल्ह्यातील डहाणू असून 24 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं. त्यावेळी वसई विरारमध्ये ज्या समस्या होत्या त्या आजही कायम आहेत. असं म्हणत "कोरोना काळात मोदी सरकारने नागरिकांना मोफत लस दिल्यामुळे आपण सर्व जण जगलो. परंतु ज्यांची या विधानसभेत सत्ता आहे ते जर त्यावेळी देशात सत्तेवर असते तर इंजेक्शन मिळाले असते का? लोक जिवंत राहिले असते का?" शिवाय तुम्ही मला थेट प्रश्न विचारू शकता, बोलू शकता. परंतु येथील सत्ताधार्याना तुम्ही असे निर्भिडपणे प्रश्न विचारू शकत नाही, असं म्हणत स्मृती इराणींनी अप्रत्यक्षपणे वसईतील आमदार हितेंद्र ठाकूर यांना लक्ष केलं.
नक्की वाचा - एकमेकाचे जिवलग मित्र झाले कट्टर राजकीय वैरी, चाळीसगाव मतदारसंघाचा गड कोणता मित्र राखणार?
भाजपकडून महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांचा राज्य आणि भाषानिहाय डेटा बँक तयार करण्यात आली असून परप्रांतीय मतांसाठी भाजपने प्रसिद्धीचे वलय असलेले भोजपुरी अभिनेते, खासदार मनोज तिवारी, स्मृति इराणी यांच्यासह सिने अभिनेते खासदार रवी किशन, श्याम चैतन्य स्वामी महाराज यांचा बंजारा समाज संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. तर वसई विधानसभा मतदारसंघात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांचा 10 नोव्हेंबर रोजी कार्यकर्ता संवाद असून, याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा यांच्या देखील सभा नालासोपारा आणि वसई मतदार संघातील उमेदवारांसाठी होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या या रणानितीवर मात करण्यासाठी प्रतिस्पर्धी असलेल्या बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेसकडून कोणती नवी रणनीती आखली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.