जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मतदारसंघ हा एक महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. या विधानसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना या मतदारसंघात रंगणार असला तरी या मतदारसंघात एकेकाचे जिवलग मित्रच एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या धुराळ्यात हे दोन मित्र आमने-सामने आले आहे. महायुती भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार मंगेश चव्हाण तसेच महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार व माजी खासदार उन्मेश पाटील हे एकेकाळचे जिवलग मित्र आता कट्टर राजकीय वैरी झाले आहे . त्यामुळे एकमेकांमध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात एकही संधी हे दोघे सोडताना दिसत नाहीत.
चाळीसगाव मतदारसंघात मंगेश चव्हाण, उन्मेश पाटील यांच्यासह 16 जणांनी या विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र 16 पैकी आठ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 8 उमेदवार या मतदारसंघात रिंगणात आहेत. मात्र असं असलं तरी खरी लढत महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण व महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेश पाटील या दोन मित्रांमध्येच रंगणार असून एकेकाळी जीव ओवाळून टाकणाऱ्या या मित्रांमध्ये चाळीसगावचा गड कोण राखणार व कोण कोणाला पराभूत करणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागला आहे.
मंगेश चव्हाण व उन्मेश पाटील यांच्यातील मैत्री ही पूर्वी राजकारणापलीकडे आहे. राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही ही मैत्री कायम आहे. त्यामुळे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी या जिवलग मित्रांची नाड जोडत 2014 मध्ये उन्मेश पाटील यांना भाजपकडून विधानसभेची उमेदवारी मिळवून दिली. यावेळी आपल्या मित्रासाठी मंगेश चव्हाण यांनी दिवस-रात्र एक करत आपल्या मित्राचा विजयश्री खेचून आणला. हे मैत्रीचे नाते असेच सुरू असताना मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या दोघांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला.
नक्की वाचा - उद्योगधंदे गुजरातला, महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा', चिपळूणमध्ये जयंत पाटलांची फटकेबाजी, महायुतीवर हल्लाबोल
2019 मध्ये विधानसभेच्या उमेदवारीसाठी उन्मेश पाटील हेच इच्छुक होते. पण विधानसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ यांना देण्यात आलेली उमेदवारी ऐनवेळी रद्द करून उन्मेश पाटील यांना देण्यात आली. लोकसभा निवडणुकीतही मंगेश चव्हाण यांनी आपल्या मित्राच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न यशस्वी ही झाले. उन्मेश पाटील हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. मात्र लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी उन्मेश पाटील यांनी आपल्या पत्नी संपदा पाटील यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला . मात्र विधानसभेच्या उमेदवारीसाठी मंगेश चव्हाण हे देखील इच्छुक होते त्यामुळे इथूनच या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले.
या मतदारसंघात आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोघांकडूनही प्रयत्न सुरू झाले. त्यातच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना देण्यात आल्याने या दोन मित्रांमधील वैर हे अधिकच वाढत गेले. अखेर याच नाराजीतून उन्मेश पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत हातात शिवबंधन बांधून आपल्याच मित्राच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा पवित्रा घेतला. चाळीसगाव मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळावा यासाठी आग्रह होता मात्र असं असतानाही उन्मेश पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत चाळीसगाव मतदार संघाची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडे खेचून आणली. त्यामुळे या निवडणुकीत चव्हाण व पाटील हे दोघे मित्र आता आमने सामने असून महायुती व महाविकास आघाडी तसेच आपल्या पक्षापेक्षाही आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या दोघांनाही महत्त्वाची आहे. त्यामुळे एकेकाळचे जिवलग मित्र आता कट्टर राजकीय वैरी झाले असून या निवडणुकीत कोण कुणाला पराभूत करणार व कोणता मित्र आपले वर्चस्व सिद्ध करून आपल्याच मित्राला धक्का देणार हे मात्र 23 तारखेनंतर स्पष्ट होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world