विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीत फूट पडल्याची चित्र पहायला मिळालं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारपदाची शपथ घ्यायची नाही असं ठरवलं होतं. शिवाय या शपथविधीवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय ही घेतला. असं असताना समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि रईस शेख या दोघांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी आपण हे पाऊल का टाकले याचे स्पष्टीकरण दिले. शिवाय आबू आझमी यांनी एक पाऊल पुढे टाकत आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाविकास आघाडीत अधिवशेनाच्या पहिल्याच दिवशी फूट पडली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी शिवसेना ठाकरे गटाबाबत नाराजी व्यक्त करत थेट मविआतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं आहे. 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली. ज्यांनी पाडली त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर पणे दिल्या जातात. ही आघाडी त्यासाठी झाली आहे का? काँग्रेसलाही मग त्यांच्या बरोबर जायचं असेल तर त्यांच्यात आणि भाजपमध्ये काय फरक राहीला असा प्रश्न आझमी यांनी उपस्थित केला. शिवाय आता त्यांच्याबरोबर आपल्याला काही घेणेदेणे नाही अशा शब्दात आझमी यांनी मविआच्या नेत्यांना फटकारले आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'कुणी संस्कृतमध्ये तर कुणी अल्लाह साक्ष....,' 'या' आमदारांचा शपथविधी ठरला खास!
तर समाजवादी पक्षाचे दुसरे आमदार रईस शेख यांनी मात्र मविआने आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे याची कोणतीही कल्पना दिली नव्हती असं सांगितलं. शिवाय आम्ही जी शपथ घेतली आहे ती संविधानाला धरून घेतली आहे. मात्र आम्ही अजूनही महाविकास आघाडीत आहोत. आम्ही आघाडीचाच भाग आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं. या आघाडीचा मुळ उद्देश हा धर्मनिरपेक्षता आणि संविधान आहे. अशा वेळी जर कोणी त्या विरोधात भूमीका घेत असेल तर ती चुकीची आहे. मिलींद नार्वेकर यांनी बाबरी मशिद बाबत केलेले ट्वीट चुकीचे आहे. याबाबत आता ठाकरे गटाने आपली भूमीका स्पष्ट केली पाहीजे असंही ते म्हणाले. त्यानंतर मविआतून बाहेर पडायचे का नाही हे आम्ही ठरवू असंही त्यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - विरोधकांचा आमदारकीची शपथ घेण्यास नकार का? पहिल्याच दिवशी पेच
दरम्यान महाविकास आघाडीत पडलेल्या फूटीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे हे आताच आम्हाला समजले आहे. त्यांनी तशी घोषणा केली असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर नक्की चर्चा करू असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यां बरोबर दोन हात करण्या ऐवजी मविआला आपल्यातच दोन हात करावे लागतात की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.