महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडील कामकाजासाठी सल्लागार म्हणून नियुक्त कंपनीच्या सल्लागारांविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच एस. टी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खात्यामार्फतही स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या संदर्भात आमदार अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले, मे.के.पी.एम.जी. या सल्लागार संस्थेच्या सल्लागारांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गैरव्यवहाराच्या आरोपावरून चौकशी सुरू आहे. सल्लागार संस्थेला तालिकाबद्ध करणाऱ्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.
चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एस. टी. महामंडळमार्फत आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. के.पी.एम.जी. ही एक मोठी आणि प्रतिष्ठीत कंपनी आहे. त्या विरोधात आता कारवाई होणार आहे. विधानसभेत याबाबत आमदार अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.