
अभिषेक भटपल्लीवार
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे आपल्याच पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांना विधानसभेत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भक्कम साथ मुनगंटीवारांना मिळाली. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील राजकीय संघर्ष सध्या जिल्ह्यात आणि भाजप वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या दोघांमधून सध्या विस्तवही जात नाही. या दोघांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे संधी मिळताच मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आज विधानसभेत केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रपूर शहरात आकाशवाणीजवळ एका नाल्यावर संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. ही भिंत शंभर मीटर लांब असून 98 कोटी रुपये यावर खर्च झाले आहेत. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून ही भिंत जलसंपदा विभागाने बांधली आहे. मात्र या भिंतीमुळे कुणाला संरक्षण मिळाले, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. नाल्याच्या एका बाजूला आणि ठराविक भागात ही भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीच्या बाजूने दोन गर्भश्रीमंत लोकांची घरे आहेत. या घरांना पुराच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप विधानसभेत करण्यात आला. हा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पण मुळ प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
ट्रेंडिंग बातमी - ड्रग्ज प्रकरणात सापडल्यास थेट मकोका लागणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
विशेष म्हणजे ज्या बाजूला लोकवस्ती आहे, उतार आहे, तिकडे ही भिंत बांधण्यात आलेला नाही. विरुद्ध बाजूने ती बांधण्यात आली आहे. त्यामुळे ही भिंत बांधण्यामागचा हेतू काय असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. शिवाय मुनगंटीवार यांनी जलसंपदा मंत्री संजय राठोड यांना धारेवर धरले. ही भींत ज्या इंजिनिअरने बांधली त्याला निलंबित करणार का त्या विरोधात काय कारवाई करणार असा प्रश्न यावेळी त्यांनी केला. त्यावर सजेशन फॉर अँक्शन असं उत्तर राठोड यांनी दिलं. त्यावर आता फक्त अँक्शन हवी. मंत्र्यांचे उत्तर हे दादा कोंडकें सारखं द्वी अर्थी आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तिथल्या दोन गर्भ श्रीमंतांसाठी ही संरक्षण भींत बांधली गेली असा आरोप यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - Narayan Rane: गोगावलें बाबतचा प्रश्न, नारायण राणेंचे उत्तर, विषयच संपवला
चंद्रपूरचे भाजप आमदार जोरगेवार यांनी या भिंतीसाठी विशेष प्रयत्न केले. या वेळी त्यांनी ही आपली बाजू मांडली. हा प्रश्न आपल्या मतदार संघातला आहेत. त्यामुळे जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत असं ते म्हणाले. विरोधक त्यात हवा भरत आहेत. पण प्रश्न आमच्याच लोकांनी उपस्थित केला आहे, असं म्हणत यांनी मुनगंटीवार यांच्याकडे ही बोट दाखवले. शिवाय यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही. या नाल्या भोवती आणखी काही संरक्षण भींती बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी निधी मंजूर झाल्याचं ही त्यांनी सांगितलं.
या निमित्ताने पुन्हा एकदा भर विधानसभेत मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार हा संघर्ष पाहायला मिळाला. मुनगंटीवार यांना आयतीच संधी मिळाली आणि त्यांनी थेट सभागृहात हा विषय उपस्थित केला. जलसंपदा मंत्री संजय राठोड यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी थेट आपल्याच पक्षाच्या आमदारावर निशाणा साधला. या विषयात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही हस्तक्षेप करीत शासकीय निधीचा हा गैरवापर सभागृहाच्या नजरेत आणून दिला. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात मुनगंटीवार सध्या एकटे पडले आहेत. जोरगेवार त्यांना शह देण्याचा वारंवार प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळेच मुनगंटीवार यांनी या भिंतीचा विषय उपस्थित करून जोरगेवार यांना आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world