राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात बुधवारी मृत्यू झाला. परंतु,तीन दिवसांचा शासकीय दुखवटा संपताच आज अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशातच नवा उत्तराधिकारी निवडण्यासाठी मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहेत. या सर्व घडामोडींमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. हेच यामागचं मुख्य कारण असल्याचं मानलं जात आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट लवकरच एकत्र येणार होते. जर दोन्ही पक्षांचं विलीनीकरण झालं, तर शरद पवार गट पक्षावर कब्जा करेल आणि आपलं वर्चस्व कमी होईल, अशी भीती अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली होती.
विमान अपघाताच्या तिसऱ्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी सुरु झाल्या.अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल,छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खलबतं केली. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करायचं आहे, अशी चर्चा त्यांनी केली.त्यानंतर संध्याकाळी बड्या नेत्यांची एक बैठक पार पडली. यावेळी सुनेत्रा पवार ऑनलाईन बैठकीत जोडल्या गेल्या होत्या. त्यानंतर बैठकीत एक निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांच्याकडे ज्या तीन जबाबदाऱ्या होत्या, त्या सर्व सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर सोपवल्या जातील, असं या बैठकीत ठरलं.
उमुख्यमंत्री पद
एनसीपी अध्यक्ष पद
एनसीपी विधिमंडळ गटनेता
महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे जे खातं होतं,त्या खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फक्त अर्थ खातं असेल. अर्थ खात्याऐवजी राष्ट्रवादीला अन्य खात्याची जबाबदारी दिली जाईल.दरम्यान,राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की,"या खात्यांच्या जबाबदाऱ्या सुनेत्रा पवार यांच्याकडे असाव्यात, अशी अनेक आमदारांची इच्छा होती. त्यामुळे त्यांचं नाव पुढे केलं गेलं".
त्या निर्णयाबाबत शरद पवारांना सांगितलं नाही
विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्याकडे या जबाबदाऱ्या सोपवण्याच्या निर्णयाबाबत शरद पवारांना सांगण्यात आलं नाही. त्यानंतर शरद पवारांनी आज शनिवारी सकाळी याबाबत नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले, "प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.त्यांना याबाबत काहीच माहित नव्हतं."सुनेत्रा पवारांच्या निवड प्रक्रियेत शरद पवारांना डावलल्यानं राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा निर्णय 17 जानेवारीला अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकी दरम्यान घेण्यात आला होता.हे यामागचं कारण मानलं जात आहे. या विलीनीकरणाबाबत 12 फेब्रुवारीला अधिकृतपणे घोषणा करण्यात येणार होती. जर दोन्ही पक्ष एकत्र आले, तर शरद पवारांसोबत निष्ठेनं काम करणाऱ्या नेत्यांचं वर्चस्व वाढेल, अशी भीती अजित पवार गटाच्या नेत्यांना होती.
सत्ता आणि कायदेशीर अडचणींची भीती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते पक्षाच्या विलीनीकरणामुळे घाबरले आहेत. हे सुद्धा एक कारण यामागं असू शकतं. शरद पवारांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं की, ते कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाहीत. कारण एकत्रित झालेली राष्ट्रवादी केंद्रात एनडीए आणि राज्यात महायुतीपासून वेगळी होऊ शकते.अशा परिस्थितीत या नेत्यांच्या हातून सत्ता जाऊ शकते. महायुतीत सामील होण्याआधी अनेक नेत्यांवर सीबीआय, ईडी, एँटी करप्शन ब्युरोने चौकशीची ससेमीरा लावला होता. महायुतीत समाविष्ट झाल्यावर त्यांना फक्त सत्ता मिळाली ननाही, तर अनेक कायदेशीर गोष्टींमध्येही दिलासा मिळाला. जर पक्ष महायुतीतून बाहेर पडला, तर त्यांच्या कायदेशीर अडचणी वाढतील, अशी भीती या नेत्यांना आहे.
सुनेत्रा पवार यांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही. त्यांनी 2024 मध्ये नणंद सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामती लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. अशातच दिग्गज नेत्यांना वाटतंय की,जर सुनेत्रा पवार पक्षाच्या प्रमुख झाल्या,तर त्यांचे निर्णय प्रभावीपणे मांडण्यात आणि पक्षात वर्चस्व ठेवणं सोपं होईल. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात अशीही चर्चा आहे की, दोन्ही गटांचं विलीनीकरण पुढे-मागे निश्चित होऊ शकतं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेत बदल होऊ शकतो.