बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उभं करुन चूक केली होती, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. अजित पवारांच्या कबुलीनंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता त्याला उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवसुराज्य यात्रा बुधवारी तुळजापुरात होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा समाचार घेताना सुप्रिया सुळे यांनी कुणाचंही नाव न घेता अजित पवारांच्या वक्तव्याला उत्तर दिलं. 'बहीणीचे प्रेम पाहा. ती 1500 रुपयांसाठी ती तुमच्यावर प्रेम करत नाही. त्यामध्ये काही ती मनापासून प्रेम करते. त्यामध्ये पैसे येतच नाहीत. अरे भावाने मागितलं असतं तर सर्व देऊन टाकलं असतं. काय पक्ष आणि चिन्ह.. काहीही मागितलं असतं तरी दिलं असतं. रिकाम्या हाताने आले होते आणि तसंच जाणार आहे. मी काय गठूड घेऊन जाणार आहे का?' असं सुळे म्हणाल्या. महिलांचा स्वभाव या सरकारला कळालाच नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले होते अजित पवार?
'माझं माझ्या सर्व बहिणींवर प्रेम आहे. कुणीही राजकारण घरात आणू नये. सुनेत्रा पवार यांना बहिणीविरुद्ध उभा करुन मी चूक केली. ते व्हायला नको होतं. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय समितीनं तो निर्णय घेतला. मला आज ते चुकीचं वाटत आहे,' असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं.
खिशातून ओवाळणी देता का?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओवाळणीचा विषय काढला. तुम्ही स्वत:च्या खिशातून ओवाळणी देता का? असा सवाल सुळे यांनी यावेळी केला. महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत. 1500 रुपये दिल्यामुळे आम्ही नात्यात वाहून जाऊ असं यांना वाटतय. हा सरकारचा गैरसमज आहे. त्यांना वाटतं 1500 रुपये दिलं की आमच्यावर कोणताही अन्याय करु शकता. याचं कारण दोन सत्तेमधील आमदार काय म्हणाले पाहा. एक आमदार म्हणाले मतदानावर माझं बारीक लक्ष आहे. दीड हजारचे तीन करु शकतो. मात्र, माझं त्या आमदारांना चॅलेंज आहे तू पैसे घेऊनच दाखव. तुम्ही पैसे घेऊन दाखवा मग आम्ही काय करायचं ते पाहू, असं आव्हान त्यांनी दिलं.
( नक्की वाचा : अजित पवारांना आता पश्चाताप का होतोय? विधानसभेपूर्वी काकांशी करणार पॅचअप? )
महाविकास आघाडी सरकार तुमच्या घरी येऊन अकाऊंटला पैसे देईन. तुम्ही कुणालाही मतदान करा आम्ही भेदभाव करणार नाही. शरद पवारांनी तेव्हा कोणीही म्हटलं नाही की, सातबारा कोरा करतोय मतदान नाही झालं तर कोरा करणार नाही, असं कोणीही म्हटलं नव्हत. कर्जमाफी राजकीय विषय नव्हता. निवडणुकीसाठी नव्हता. शेतकरी अडचणीत आला होता, त्याला मदतीसाठी कर्जमाफी केली होती. आता शेतकरी अडचणीत आहे. त्यासाठीच आपल्याला सरकार बदलायचं आहे, असं आवाहन त्यांनी केलं.