महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला आहे. राज्यपालांनीही गुरूवारी सत्ता स्थापनेची निमंत्रण दिले आहे. त्यानुसार आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मात्र एकनाथ शिंदे यांचे काय? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. एकनाथ शिंदे यांनीही मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही हे स्पष्ट केले नाही. थोडी कळ काढा. संध्याकाळी सर्व काही स्पष्ट होईल असं उत्तर देत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी अशी इच्छा शिवसेने बरोबरच महायुतीतल्या नेत्यांची आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ही एकनाथ शिंदे यांना गळ घातली आहे. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे अशी मी त्यांना विनंती केली आहे असे फडणवीस म्हणाले. ते माझ्या विनंतीला नक्कीच मान देतील. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्रिपद हे एक टेक्निकल अरेंजमेंट आहे. सरकार आम्ही तिघे मिळवून चालवू असंही फडणवीस म्हणाले. आम्ही एकत्री चांगले सरकार देवू असंही फडणवीस म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - फडणवीस करणार आपल्या नावावर अनोखं रेकॉर्ड, जे भुजबळ,आबा, दादांना जमलं नाही ते...
याबाबत एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट काही सांगितले नाही. तुम्ही मंत्रिमंडळात सहभागी होणार का याबाबतचा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. तुम्ही जरा दम काढा. जे काही आहे ते सध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. कोण शपथ घेणार कोण शपथ घेणार नाही हे सर्व काही सांगितलं जाईल असं शिंदे म्हणाले. सर्वांना मी मंत्रिमंडळात असावं असं वाटतं. तशी त्यांनी माझ्याकडे विनंतीही केली आहे. मी सर्वांचा मान राखतो आदर करतो. पण मंत्रिमंडळात जायचे की नाही याचा निर्णय आपण संध्याकाळपर्यंत नक्की घेवू. त्याची माहिती पत्रकारांना दिली जाईल असे सांगत शिंदेंनी आपल्या सहभागाबाबत सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे.
ट्रेंडिंग बातमी - भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं
एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्याच वेळी मात्र अजित पवारांनी मात्र आपण शपथ घेणार आहोत. आपण थांबणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यावर दादांना संकाळच्या शपथविधीचा अनुभव आहे. आता ते संध्याकाळच्या शपथविधीचा अनुभव घेतील असं मिश्किल उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. त्याच बरोबर आपला निर्णय संध्याकाळ पर्यंत होईल. थोडी कळ काढा. सर्व गोष्टी स्पष्ट होतील असंही शिंदे यावेळी म्हणाले. त्यामुळे संध्याकाळपर्यंत काय घडामोडी घडतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीसां बरोबर अजित पवार शपथ घेणार आहेत. तर शिंदेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.