शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मतदानासाठी भरपगारी विशेष रजेची तरतूद

नाशिक शिक्षक मतदार संघासाठी 26 जून रोजी सकाळी 7 ते सायं 6 या वेळेत मतदान होणार आहे.

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजवता यावा यासाठी 26 जून 2024 रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. नाशिक शिक्षक मतदार संघासाठी 26 जून रोजी सकाळी 7 ते सायं 6 या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्ह्यात 5 हजार 393 शिक्षक मतदार असून त्यांच्यासाठी जिल्ह्यात 09 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. 

नक्की वाचा - महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजितदादांवर दबाव, पवारांसमोरील पर्याय काय?

लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार, मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मर्यादित मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासनाने विशेष नैमित्तिक रजा जाहीर केली आहे. ही रजा शिक्षक मतदारांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी केलेल्या शिक्षक मतदारांनी मतदानासाठी मिळालेल्या या विशेष नैमित्तिक रजा सवलतीचा लाभ घेऊन मतदान करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.