जाहिरात

महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजितदादांवर दबाव, पवारांसमोरील पर्याय काय?

अजित पवारांवर पक्षातूनच दबाव वाढण्यास सुरूवात झाली आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार आग्रही आहेत.

महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजितदादांवर दबाव, पवारांसमोरील पर्याय काय?
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत सर्वात वाईट कामगिरी राहीली आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची. त्यांच्या वाट्याला चार जागा आल्या होत्या. त्या पैकी त्यांना केवळ एक जागा जिंकता आली. शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान मिळू शकले नाही. आता लवकरच विधानसभा निवडणुका होवू घातल्या आहेत. अशा वेळी अजित पवारांवर पक्षातूनच दबाव वाढण्यास सुरूवात झाली आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार आग्रही आहेत. यात सर्वाधिक आमदार हे मराठवाड्यातील आहे. त्यामुळे आधीच अडचणित असलेले अजित पवार आणखीन एका कात्रीत सापडल्याची चर्चा आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

आमदारांचे म्हणणे काय? 

लोकसभा निवडणुकीचे निकालानंतर अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल आहे. त्यानंतर पक्षाकडून आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत पक्षाची बैठक झाली. या बैठकीला सर्व आमदारांना बोलावण्यात आले होते. उपस्थित असलेल्या आमदारांपैकी 50 टक्के आमदारांनी महायुतीतून बाहेर पडावे अशी भूमीका मांडली. भाजपबरोबर जाणं हे लोकांना आवडलं नाही. त्याचा फटका निवडणुकीत बसला असे या आमदारांचे म्हणणे होते.अनेक मतदार संघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आहे. अशा वेळी एकमेकांची मते ट्रान्स्फर होणार नाहीत असेही ते म्हणाले.

ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांच्या रामदास कदमांना शुभेच्छा, अलगद चिमटे काढले,नक्की काय घडलं?

मराठवाड्यातीला आमदार आघाडीवर 

महायुतीतून बाहेर पडावे ही मागणी जर कोणी केली असेल तर ती मराठवाड्यातील आमदारांनी केल्याचे समोर आले आहे. मराठा आंदोलनाचा फटका याच भागात महायुतीला बसला. शिवाय यातील अनेक मतदार संघात पारंपारीक पणे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष राहीला आहे. त्यामुळे अचानक हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने मतदार ही संभ्रमात पडले. त्यांना ही युती पटली नाही. त्याचा फटका अनेक मतदार संघात बसला. 

पारंपारीक मतदारही दुरावला 

राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. अजित पवारांवर शरद पवार भारी पडले. अजित पवारांची भूमीका राष्ट्रवादीला मानणाऱ्या मतदारांना पटली नाही. त्यामुळेच या निवडणुकीत  मराठा, मुस्लिम आणि दलित हे राष्ट्रवादीचे पारंपारीक मतदार त्यांच्यापासून दुरावल्याचे चित्र पाहायला मिळाले. असेच चित्र राहीले तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही अपेक्षित यश मिळणार नाही असा आमदारांचा होरा या बैठकीत होता. 

अजित पवारां समोर पर्याय काय? 

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर अजित पवार गट अलर्ट मोडवर आला. बैठकांचा धडाका सुरू झाला. अशात आता आमदारांनीच महायुतीतून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा पराभवाचे खापर हे अजित पवारांवर फोडण्यात आले. भाजपचे नेतेही तसा आरोप करत आहेत. तर शिवसेना शिंदे गटानेही तिच री ओढत अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. अशा वेळी नक्की करावे काय असा प्रश्न अजित पवारांपुढे आहे. एक तर महायुतीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढणे हा त्यांच्या पुढे पर्याय आहेत. तर दुसरीकडे भाजप देईल तेवढ्या जागांवर निमुटपणे लढणे हा दुसरा पर्याय त्यांच्या समोर आहे. तर पुन्हा एकदा तडजोड करून शरद पवारांकडे परत जाणे हा ही तिसरा पर्याय अजित पवारां समोर असणार आहे. त्याहूनही जे आमदार सोडून जावू इच्छीत आहेत त्यांना त्यांच्या मार्गाने जावून देणे या शिवाय दुसरे पर्याय अजित पवारां समोर सध्या तरी नाहीत हे स्पष्ट आहेत.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com