देवेंद्र कोल्हटकर
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येतील अशी सातत्याने चर्चा होताना पाहायला मिळत आहे. त्याला कारण म्हणजे दोन महिन्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका यूट्यूब चैनल ला दिलेली मुलाखत आहे. या मुलाखतीनंतर राज ठाकरेंना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिसाद महत्वाचा होता. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील याची चर्चा राजकीय वर्तूळात चवीने बोलली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हे दोन ठाकरे बंधू एकत्र येतील की नाही या चर्चा घडत असताना दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आणि नेते मात्र एक झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबई विमानतळावरील इंडिगो एअरलाइन्स मधील कामगारांच्या पगाराच्या प्रश्नासंदर्भात राज ठाकरे यांच्या मनसेची हवाई कर्मचारी सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भारतीय कामगार सेना एकत्र आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे भाजप प्रणित युनियनच्या विरोधात या दोन्ही संघटना एकत्र आल्या आहेत.
चुनाभट्टी इथल्या श्रमरक्षा भवन इथं शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची बैठक झाली. ही बैठक एकत्र झाली. या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, इंडिगो मॅनेजमेंटने लबाडी केली आहे. भाजपाच्या दबावाखाली ती काम करत आहेत. काल परवा रवींद्र चव्हाण यांच्या आशीर्वादाने जन्माला आलेली युनियन यांच्याबरोबर मॅनेजमेंट कशी चर्चा करू शकते असा प्रश्न त्यांनी केला. गरिबांच्या तोंडातला घास काढणारा करार यांनी केला आहे. भाजप युनियनने केलेली लबाडी आयुक्तांना सांगितली आहे. मराठी हित, महाराष्ट्र हितासाठी एकत्र आले पाहिजे. मराठी मतदारांचा दबाव आला पाहिजे की मराठी साठी एक व्हा. महाराष्ट्र दुभंगला आहे त्यासाठी एक व्हाव लागेल. असं ही ते यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यातील 'ही' पर्यटन स्थळं पुढील 3 महिने राहणार बंद
याच बैठकीसाठी उपस्थित असणारे मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी देखील कामगारांच्या प्रश्नावर आम्ही एक एकत्र आलो आहोत. पण राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र यावेळी त्यांनी भाजपच्या युनियन वर टीका केली. नितीन सरदेसाई म्हणाले, मे महिन्यात भाजपची युनियन स्थापन झाली. तिने करार केला. जो अन्यायकारक होता. त्यामुळे आम्ही आमची नाराजी व्यक्त केली आहे. वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू.आजचा विषय कामगार आयुक्तांकडचा आहे. आम्ही कर्मचाऱ्यांसाठी भांडत आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं.
मुंबई विमानतळावरील कामगारांच्या हक्कासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र आंदोलन ही केलं. इंडिगो एअरलाइन्सच्या कामगारांच्या प्रश्नसंदर्भात हे आंदोलन करण्यात आले. शिवसेना ठाकरे यांची युनियन आणि मनसे युनियनशी संबंधित कामगारांचे मॅनेजमेंट विरोधात काम बंद आंदोलन केले. भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संजय कदम आणि मनसे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. ही एक सुरूवात झाली आहे असं राजकीय वर्तूळात बोललं जात आहे. पुढे काय होतं याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागलं आहे.