आगामी मुंबई महापालिका आणि होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेना उबाठा स्वबळावर लढेल याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. शिवसेनेच्या मुंबईसह अन्य महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे. त्यांच्या बरोबर बैठकाही झाल्या आहेत. त्या सर्वांचं मत आहे एकटं लढलं पाहीजे. आपली ताकद ही आहे. अजून निवडणूका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे तुमची जिद्द पाहाणार आहे. तयारी पाहाणार आहे आणि कार्यकर्त्याच्या मना प्रमाणे निर्णय घेणार आहे असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्याच जाहीर सभेत बोलत होते. यावेळी ते भलतेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत भाजपने कशी गद्दारी केली आहे याचा इतिहासच वाचला. अगदी शामा प्रसाद मुखर्जीं पासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत भाजपच्या नेत्यांनी काय काय केलं होतं हेच जाहीर पणे सांगितलं. पण आगामी मुंबई महापालिका निवडणुकींबाबत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावर त्यांनी स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आपण जो निर्णय घेवू तो कार्यकर्त्यांच्या मना प्रमाणे घेवू असंही ते म्हणाले. अनेकांनी स्वबळावर लढण्याचे सांगितले आहे. त्यातून तुमची तयार आणि जिद्द पाहून निर्णय घेवू. पण यावेळी मला सूड उगवून पाहीजे.
जो आपल्या पाठीत वार करतो. आपल्या कुशीत वार करतो अशा गद्दारांना आणि गद्दारांवर हरदहस्त असणाऱ्यांना महाराष्ट्रात थारा नको. त्यांना त्यांची जागा आगामी निवडणुकीत दाखवून द्या. अमित शहांना एकच सांगतो, आमच्या नादी जास्त लागू नका. जेवढे अंगावर याल तेवढे वळ पाठीवर घेवून दिल्लीला परत जाला असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी शहांना आणि भाजपला दिली आहे. शिवाय विधानसभेला जो पराभव झाला तो आपल्याला पटलेला नाही. महाराष्ट्राच्या जनतेलाही तो पटला नाही. लोकसभेला जो मोदी शहांना महाराष्ट्राने दणका दिला त्याचा धसका त्यांनी घेतला. महाराष्ट्र हातून गेला तर दिल्ली ही हातून जाईल हे त्यांना माहित होते. त्यातूनच असा निकाल लावला गेला. भाजपच्या अनेकांनाही हा विजय अजून पचनी पडलेला नाही. ते ही त्या धक्क्यात आहेत असंही ते म्हणाले. जर दम असेल तर ईव्हीएम सोडून बॅलेटवर मतदान घ्या असं आव्हानही ठाकरे यांनी यावेळी दिलं.
उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली असं अमित शहा म्हणाले होते. त्याचा चांगलाच समाचार या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी घेतला. तुम्ही मराठी माणसाच्या नादी लागू नका. जखमी वाघ काय असतो त्याचा पंजा काय असतो ते तुम्हाला नक्की दिसेल. औरंगजेबाला मराठी माणसानेच झुकवले. तर अमित शहा किस झाड की पत्ती आहेत असं त्यांनी ठणकावलं. उद्धव ठाकरेला कुणी संपवू शकत नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन. माझ्या पाठीत वार करून मी संपणार नाही. मैदान सोडणारा मी नाही. तुमच्या ताकदीवर मी लढत आहे आणि लढत रहाणार असंही ते म्हणाले.
मी हिंदू अभिमानी आहे. तसा मराठी भाषेचाही कडवट अभिमानी आहे. प्रेमाने वागाल तर तुम्हाला उचलून देवू. कपटाने वागाल तर उचलून आपटू. आम्ही आरएसएस भाजपवाले नाही. मरायला तुम्ही आणि मिरवायला आम्ही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. शिवाय एकनाथ शिंदे यांच्यावर ही टिका करण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी सोडली नाही. काही झालं तरी एकनाथ शिंदे हे रुसतात. त्यामुळे त्यांची अवस्था रुसू बाई रुसू आणि गावाला जावून बसू अशी त्यांची अवस्था झाली आहे अशी टिकाही त्यांनी शिंदेंची केली. गद्दारांना विचार नाहीत. अचार नाही. ते चिरकतच राहाणार आहेत. पण त्यांना आपण काय करत आहोत हेच समजत नाही असं ही उद्धव यावेळी म्हणाले.