राकेश गुडेकर
वैभव खेडेकर म्हणजे कोकणातील मनसेचा चेहरा. खेड नगर परिषदेवर त्यांनी आपली एकहाती सत्ता राबवली होती. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या बरोबर त्यांनी दोन हात ही केले होते. संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. पण गेल्या काही दिवसापासून ते पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. त्याच वेळी त्यांनी भाजप नेत्यांच्याही भेटी घेतल्या. हेच निमित्त झालं. पक्षाने थेट कारवाई करत त्यांची हाकालपट्टी केली. त्यानंतर वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमीका स्पष्ट केली. शिवाय कारवाईनंतर आपल्याला सर्वात पहिला फोन कुणाचा आला हे ही जाहीर पणे सांगितले. त्यामुळे खेडेकरांची पुढची दिशा काय असणार याचा अंदाज लावला जात आहे.
कारवाई झाल्यानंतर वैभव खेडेकर हे भावूक झाले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यासह जिल्हाध्यक्षांवर बडतर्फ केल्याची बातमी समजली. बडतर्फीचे पत्र वाचून अतिशय दुःख झाले असं ते म्हणाले. हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट आहे असं ही त्यांनी सांगितलं. अनेक आंदोलनं केली. पक्षासाठी जेलमध्ये ही गेलो. प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग होता. कोकणात पक्षाची बीजे मी रुजवली. खेड नगर परिषद माझ्या नेतृत्वात पंधरा वर्षे मनसेकडे होती. मी पहिल्यांदा थेट नगराध्यक्ष झालो. पक्ष म्हणून कोकणात जे प्रसंग ओढवले त्यावेळी लोकामध्ये मीच होतो. कोरोनामध्ये काम केलं. पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली. त्याचे फळ आपल्याला मिळाले असंही ते म्हणाले.
नक्की वाचा - MNS News: मनसेला जबर हादरा! बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरेंचा आदेश
भाजपच्या काही लोकांना आपण भेटलो होतो. त्यांना भेटलो म्हणजे मी पक्षांतर करणार का? केवळ या संशयावरून माझ्यावर कारवाई झाली. पण मी पक्षप्रवेश करणार नव्हतो. कार्यकर्त्याला तडीपारीची होणारी कारवाई थांबावी म्हणून मी नितेश राणे यांना भेटलो होतो असं ही ते म्हणाले. विकास होणे महत्वाचे असल्याने सत्ताधाऱ्यांना भेटायचो. त्यामुळेच माझ्यावर कारवाई झाली असं ही ते म्हणाले. मात्र माझ्याबद्दल संशय निर्माण केला गेला. याबद्दल मी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण मला अद्याप भेट भेटलेली नाही. संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून मी भेटीचे अनेक प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. हे माझं दुर्दैव आहे असं ही त्यांनी सांगितलं.
आपल्यावर कारवाईचे पत्र स्वतः साहेबांनी काढलं असत तर तो त्यांचा आदेश आल्याचा आनंद बाळगला असता. पक्षाची शिस्त बिघडेल असे मी कधीच काम केले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो म्हणून माझ्यावर अनेक कारवाया झाल्या. पक्षासाठी केलेली माझी धडपड आज तोकडी पडली. हे बोलत असताना वैभव खेडेकर भावूक झाले होते. राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना तुम्ही कालही मनात होता, आजही आहात आणि उद्याही राहाल असे ते म्हणाले. तीस वर्षे पक्ष म्हणून कुटुंबाशी जोडलो गेलो होतो. आजच्या पत्रामुळे कौटुंबिक संबंधाला ब्रेक मिळाला. आजचे पत्र पाहून धक्का बसला. असं पत्र मला कधीही अपेक्षित नव्हतं. पण हातात घेतलेलं शिवधनुष्य अर्धवट ठेवणार नाही. पुढील निर्णय घ्यावा लागेल असं ते म्हणाले.
पुढे कोणत्या पक्षात जायचं याबाबत निर्णय घेतलेला नाही. फिनिक्स पक्षाप्रमाणे मी पुन्हा उभारी घेईन. माझ्यावर अशा पद्धतीची वेळ येणार असेल तर बाकीच्या पदाधिकाऱ्यांचा विचार करण्याचीही वेळ आहे. झालेली घटना नाकारता येत नाही. हे स्वीकारून मी पुढे जाईल. मला अजिबात घाई नाही. मी योग्य वेळेची वाट पाहून निर्णय घेईल. आपण आपल्या कार्यकर्त्यांचा लवकरच मेळावा घेणार असल्याचं ही त्यांनी सांगिलं. राज ठाकरेंचा आमच्याकडे फोन नंबर नाही. केवळ मेसेज करू शकतो असा नंबर आमच्याकडे आहे. असं सांगताना आपल्यावर कारवाई झाल्यानंतर सर्वात आधी नितेश राणे यांनी आपल्याला फोन केला होता. त्यांनी आपल्याला धीर दिला असे त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात खेडेकर हे भाजपमध्ये जातील असा तर्क लावला जात आहे.