'पक्षश्रेंष्ठींनी कारवाई केली नाही म्हणून डेअरिंग वाढली', काँग्रेस आमदारानं सांगितलं गद्दारांचं सत्य

Vidhan Parishad Election 2024 : विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची काही मतं फुटणार हे पक्षाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी यापूर्वीच सांगितलं होतं.

Advertisement
Read Time: 3 mins
K
मुंबई:


विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये राजकारण चांगलंच तापलंय. या निवडणुकीत काँग्रेसमधील मतं फुटल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे काँग्रेसची काही मतं फुटणार हे पक्षाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. हा दावा खरा ठरल्यानंतर गोरंट्याल यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पक्षातील गद्दारांबाबतचं सत्य सांगितलं आहे.

'गडबड होणार हा संशय होता'

'विधिमंडळाचं अधिवेशन 25 जूनपासून सुरु झालं. मला तेंव्हापासूनच संशय होता. मोबाईलवर बोलणं, बाहेर काहींशी संपर्क साधणे यावरून हा संशय होता. 12 तारखेच्या निवडणुकीत हे काहीतरी गडबड करणार याची मला कल्पना आली होती, म्हणून 11 तारखेलाच मी माध्यमांना याबाबत सूचना दिली होती. जे संशयाच्या भोवऱ्यात होते त्यांना मी स्वत:घेऊन गेलो होतो. दिल्लीला रिपोर्ट गेला आहे. उरलेल्या 30 आमदारांवरही शंका घेतली जाऊ लागली आहे. त्यामुळे 19 तारखेला पक्षश्रेष्ठींनी नावे जाहीर करावी असी मागणी करणार आहे,' असं गोरंट्याला यांनी सांगितलं. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणते आमदार फुटले?

कैलास गोरंट्याल यांनी यावेळी काँग्रेसचे कोणते उमेदवार फुटले याबाबत सूचक इशारा केला. मुंबई, नांदेड आणि मला वाटतं त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातील आमदार आहेत. अमरावतीचेही आमदार असावेत, असं त्यांनी कुणाचंही नाव न घेता सांगितलं.

'मी पोल खोलली त्यातले ३ परफेक्ट निघाले. कदाचित या तिघांपैकी एकाने माझे नाव दिले असेल. मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारले की माझे नाव येत आहे, त्यावर त्यांनी  यात तुमचे नाव नाही, हे स्पष्ट केलं. एका वर्तमानपत्राविरोधात मी अब्रूनुकसानीचा दावा टोकणार आहे. किती रकमेचा दावा करायचा हे वकील आणि मी बसून ठरवू,' असं गोरंट्याल म्हणाले. 

दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्या निवडणुकीचा उल्लेखही गोरंट्याल यांनी केला. 'चंद्रकांत हंडोरे यांना पाडलं त्यावेळीच सगळ्यांची नावं समोर आली होती. अविश्वास प्रस्ताव आणला होता तेव्हाही काहीजण उशिरा आले होते. पक्षश्रेष्ठींनी यांच्यावर कारवाई केली नाही म्हणून यांची डेअरींग वाढली. आमचं काहीही होणार नाही, असं त्यांना वाटायला लागलं,' असा घरचा आहेर गोरंट्याल यांनी दिला. 

( नक्की वाचा : Vidhan Parishad Election Result : महाविकास आघाडी फुटली! वाचा कोणत्या आमदारांनी दिला धक्का )

'सरकार आलं नाही तरी चालेल...'

गेल्या वेळी काँग्रेसचे एक मोठे फुटले होते. त्यांच्यावर कारवाई करू नये असे काँग्रेस नेत्यांना त्यावेळी वाटत होते. कारण लोकसभा, विधानसभा निवडणूक होती. मात्र हे लोकं सुधारत नाही. गद्दारीची परंपरा त्यांनी चालू ठेवली. त्यांच्या चेलेचपाट्यांनीही तेच केले. त्यांना धडा शिकवला पाहीजे.  सध्या काँग्रेसचे  37 आमदार आहेत, त्यातील 7 गद्दार आहेत. त्यांच्यामुळे लोकं आमच्यासारख्या 30 इमानदार आमदारांवर संशय व्यक्त करू लागले आहेत. उद्या महाराष्ट्रात मविआचे सरकार नाही आले तरी चालेल पण गद्दारांचे नाव समोर आलं पाहिजे, अशी मागणी  कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. 
 

Advertisement