'एक हजार टक्के माझं मत फुटलं नाही,' काँग्रेसच्या 'त्या' आमदारानं सर्व सांगितलं! पटोलेंना म्हणाले...

Congress MLA Hiraman Khoskar : इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना इशारा दिलाय.

जाहिरात
Read Time: 3 mins
Hiraman Khoskar Nana Patole
नाशिक:

प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये जोरदार घडामोडी घडत आहे. या निवडणुकीत पक्षाची मतं फुटली, असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मान्य केलं. आम्ही ट्रॅप लावला होता, त्यामध्ये आमदार अडकले, आता त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची घोषणा पटोले यांनी केलीय. या निवडणुकीत इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांच्यावर मत फुटल्याचा आरोप करण्यात येतोय. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. खोसकर यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाला सूचक इशाराही दिलाय.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुख्यमंत्र्यांची प्रशंसा

खोसकर यांनी या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार प्रशंसा केली आहे.  'मी अजितदादा गटाला मत दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. मी 25 वर्षांपासून जिल्हा परिषदेत काम करतोय. मला लोकसभा निवडणुकीच्या वेळी सीएम साहेबांनी 6 वेळा फोन केले होते.  मी त्यांना तुमच्या पक्षाचं काम करणार नाही, असं सांगितलं होतं. विधानपरिषदेलााही सीएम साहेबांनी आम्हाला मदत करा असं म्हंटलं होतं, पण मी काँग्रेसशी बांधिल आहे, असा खुलासा खोसकर यांनी केलाय. 

मला एके दिवशी मला सीएम साहेबानी रात्री अडीच वाजता खिचडी खाऊ घातली होती. त्यांनी माझी खूप कामं केली, या शब्दात खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रशंसा केली. या निवडणुकीत 3 दिवस मी फोन बंद केला होता. सीएम, फडणवीस, अजितदादा कुणाचाही फोन नको म्हणून मी हे केलं होतं, असं खोसकर म्हणाले.

( नक्की वाचा : महाविकास आघाडी फुटली! वाचा कोणत्या आमदारांनी दिला धक्का )
 

कुणाला मतदान केलं?

हिरामण खोसकर यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत कुणाला मतदान केलं हे देखील सांगितलं. मी पहिलं मत मिलिंद नार्वेकर, दुसरं  जयंत पाटील आणि तिसरं सातव ताई (डॉ. प्रज्ञा सातव) यांना दिलं. काँग्रेस पक्षानं सांगितलं त्याप्रमाणेच मतदान केलं. जयंत पाटील यांना कुणाला मतदान करायला सांगितलंय हे आम्हाला माहिती नव्हतं,' असं खोसकर यावेळी म्हणाले. 

Advertisement

नाना पटोलेंना इशारा

कोर्टात जोपर्यंत मत सिद्ध होत नाही तोपर्यंत माझ्यावर कारवाई करू शकत नाही. एक हजार एक टक्के माझे मत फुटले नाही. नाना पटोले वरिष्ठ आहेत. त्यांनी पहिल्यांदा माझं मत चेक करावं मी असं कुणाचाही ऐकून घेऊ शकत नाही, असा इशारा खोसकर यांनी दिला.

पटोले मोठे नेते आहेत. त्यांचं दिल्लीपर्यंत वजन आहे. त्यांनी मला बोलावून घ्या. मीडियासमोर बदनामी का करताय? आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नाराज करु नये. मागच्या निवडणुकीत माझ्याकडून चूक झाली. पण, यंदा चुकलो नाही असा दावा खोसकर यांनी केला.  

Advertisement

( नक्की वाचा : विधानपरिषद निवडणुकीत 'फडणवीस पॅटर्न' कायम, शरद पवार-ठाकरेंना दिला धोबीपछाड )
 

काँग्रेसकडंच तिकीट मागणार

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडूनच तिकीट मागणार असल्याचं खोसकर यांनी स्पष्ट केलंय. 'मी महायुतीमध्ये जाणार नाही. मी मतदारसंघात फक्त विकास बघतो. पक्ष बघत नाही. सीएम, अजितदादांच्या पत्रावर मी अनेक कामं आणली. मी विधानसभेत काँग्रेसकडूनच उमेदवारी मागणार. मला तिकीट दिलं नाही, तर स्थानिक कार्यकर्ते, नेते काय म्हणतील तशी रणनीती ठरवू,' असं खोसकर यांनी सांगितलंय.