औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्याचं राजकारण चांगलचं तापलं आहे. यावरुन मुख्यमंत्र्यांच्या नागपूरातही सोमवारी रात्री दोन गटात जोरदार राडा झाला. याचे पडसाद मंगळवारी विधीमंडळात ही उमटले. विरोधकांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत त्याला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली. तर सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनीही निदर्शनं करत औरंगजेबाची कबर उखडून फेका ही मागणी लावून धरली. पण त्याच वेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्याबाबत प्रश्न विचारताच त्यांची कोंडी झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकां बरोबर सत्ताधारी ही आंदोलन करत होते. सत्ताधाऱ्यांकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे आघाडीवर होते. एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले तर आम्ही स्वत: जावून औरंगजेबाची कबर उखडून फेकू असं ही ते सांगित होते. बरं ते येवढ्यावर थांबले नाहीत, विरोधक हिंदूस्तानात राहात असतील आणि पाकिस्तानचे औरंगजेबाचे गुणगाण गात असतील तर त्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही. त्यांचं आदोलन हे हिरव्या मतांसाठी आहे. आम्ही हिंदू आहोत. आम्हाला कुणाच्या मताची गरज नाही. असं ही बांगर यावेळी आवातावाने सांगत होते.
पण याच वेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या बद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावेळी मात्र बांगर साहेबांची धांदल उडाली. या प्रश्नांनी ते आधी थोडे गडबडले पण नंतर त्यांची गाडी सुसाट सुटली. प्रश्न कोरटकर बाबतचा होता, पण उत्तर देताना ते म्हणाले, हे ध्यानात ठेवा आम्ही हिंदू आहोत. हिंदू म्हणून जन्म घेतला आहे. औरंगजेबाची औलाद ही विरोधकांची आहे. यांना शिवाजी महाराज की जय म्हणता येत नाही. तसं म्हटलं तर त्यांना हिरवी मतं मिळत नाहीत. आम्ही कट्टर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, असं उत्तर देत त्यांनी मुळ प्रश्नालाच बगल दिली.
ट्रेंडिंग बातमी - Crime News: सेल्फीमुळे पकडला गेला चोर, उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच साधत होता डाव
बांगर यांनी अशा पद्धतीने उत्तर दिल्याने नक्की शिवसेना शिंदे गटाची भूमीका काय? अशी चर्चा या निमित्ताने विधान भवनात रंगली होती. ज्या कोरटकर आणि सोलापूरकरने महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याबाबत एकही शब्द बांगर यांनी उच्चारला नाही. उलट भलतच उत्तर देवून ते मोकळे झाले. दरम्यान या भूमीकेवर आता विरोधकांनीही जोरदार टीका केली आहे. नागपूरमध्ये दंगल भाजपलाच हवी होती. दंगल व्हावी असं वातावरण त्यांनी निर्माण केलं. दंगल रोखण्यासाठी त्यांनी कोणते ही प्रयत्न केले नाहीत. दंगल झाली ही पाहिजे आणि थांबायला ही नको, हे सर्व भाजपने केले. त्या सरकारने पाठिंबा दिला असं वाटत आहे, असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं.
दरम्यान या आंदोलना वेळी काँग्रेस आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. द्वेष पसरवणाऱ्या मंत्री नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय दंगल नको,शांतत हवी अशा घोषणा देण्यात आल्या. शांतता प्रिय महाराष्ट्र हवा,दंगल मुक्त महाराष्ट्र हवा असा नाराही यावेळी विरोधकांनी दिला. शिवाय नागपूरच्या दंगलीत सरकार शंभर टक्के अपयशी ठरलं आहे. सरकारमधील एक बडबोल्या मंत्री गेल्या 4 महिन्यापासून दोन धर्मात आग लागेल असं वक्तव्य करत आहे. त्याला वेळीच आवर घाला हे आम्ही आधीच सांगितलं होतं, असं विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.