महायुतीत सर्व काही ठिक नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीत घुसमट होत आहे. शिंदे आणि भाजपमधील अंतर हे वाढत चाललं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नैराश्यात आहेत. तर अजित पवारांनी आता महाविकास आघाडीत परत यायला पाहिजे, तसे झाल्यास त्यांचे मुख्यमंत्री होण्याची स्वप्न नक्की पूर्ण होईल असं वक्तव्य शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. असं वक्तव्य करत त्यांनी अजित पवारांना एक प्रकारे ऑफर दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या काही दिवसापासून महायुतीत कुरबूरी सुरू असल्याची चर्चा होती. त्यावरून आता विरोधकांनीही याबाबत बोलण्यास सुरूवात केली आहे. एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज आहेत. त्यांचे ऐकलं जात नाही. शिवाय भाजप आणि त्यांच्यातील अंतर हे वाढत चाललं आहे. त्यामुळे शिंदे हे नैराश्यात गेले आहेत असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं आहे. शिवाय हीच संधी साधत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही चुचकारलं आहे. पवारांनी महाविकास आघाडीत यावे अशी खुली ऑफरच त्यांनी दिली आहे. तसं झाल्यास त्याचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं ही ते म्हणाले.
दुसरीकडे त्यांनी ठाकरे बंधू एकत्र यायला पाहीजेत असं म्हटलं आहेत. तशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे असं ही ते म्हणाले. यावेळी बोलताना राऊत यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबतही वक्तव्य केलं. या महामार्गाला स्थानिक खासदार म्हणून नारायण राणे यांनी विरोध करावा असं आव्हान त्यांनी दिलं. शक्तीपिठ मार्गासाठी सुपीक जमीन हडप केली जात असल्याचा आरोपही त्यांनी या निमित्ताने केला. शक्तीपीठमधील जमिन राज्यकर्ते विकत घेत आहेत असं ही ते म्हणाले.
पहलगाम हल्ल्या बाबतही राऊत यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. देशाचे पंतप्रधान जम्मू -काश्मीर, पहलगामला का गेले नाहीत? त्यांनी मृताचा नातेवाईकांची भेट का नाही घेतली असा प्रश्न उपस्थित केला आहे. पहलगाममधील अतिरेकी अचानक आले नाहीत असं म्हणताना, हा हल्ला मोदी सरकारचं अपयश असल्याचं ते म्हणाले. सध्या युद्धाचं वातावरण तयार केले जात आहे. त्यातून पक्षाची प्रसिद्धी केली जात आहे असा आरोप ही राऊत यांनी केला.