विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली हे आता निश्चित झाले आहे. पण मतदान होण्या पूर्वीच काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आमची चार मते फुटणार आहे हे वक्तव्य करून सकाळीच बॉम्ब टाकला होता. शिवाय ते चार जण कोण याचे संकेतही दिले होते. 11 जागांसाठी 12 उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात होते. घोडे बाजार रंगण्याची दाट शक्यता होती. अशात गोरंट्याल यांनी एक वक्तव्य केले.
गोरंट्याल यांनी सकाळीच सांगितलं होतं. काँग्रेसची 4 मतं फुटणार. हे सांगताना ते काँग्रेस आमदार कोण असतील याचे संकेतही दिले होते. त्यानुसार त्यांनी सांगितलं. कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेलेला. कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे. एक टोपीवाला कधी इकडे असतो कधी तिकडे असतो.आणि एक नांदेडवालाही. असे सांगत त्यांनी ते आमदार कोण याचे संकेत देवून टाकले होते.
काँग्रेसकडे पुरेशा आमदारांचा संख्याबळ असल्यामुळे प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित होताच. पण मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचं भवितव्य काँग्रेसच्या मतांवर ठरणार होतं. अशावेळी कैलास गोरंट्याल यांनी सर्वांनाच पेचात पाडलं. कैलास गोरंट्याल यांनी सांगितलेल्या कोडवर्डनुसार त्या चार आमदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला.पहिला कोड होता. कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला. यानुसार पहिलंच नाव चर्चेत आलं झिशान सिद्दीकी यांचं. कारण बाबा सिद्दीकी नुकतेच अजित पवार गटात सहभागी झाले होते. शिवाय झिशान काँग्रेसच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे संशयाची सुई आणखी बळावली होती. पण झिशान यांनी पक्ष आदेशाप्रमाणेच मतदान केल्याचं स्पष्ट केलं.
दुसरा कोड होता, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे. यावर सुलभा खोडके यांचं नाव चर्चेत आलं. कारण सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. शरद पवार गटात फूट पडल्यानंतर ते अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे सुलभा खोडकेंचं मतं फुटेल अशी चर्चा रंगली.
तिसरा कोड होता एक टोपीवाला..कधी इकडे कधी तिकडे असतो. टोपीवाला म्हटल्यावर सगळ्यांचं लक्ष गेलं हिरामण खोसकर यांच्याकडे. हिरामण खोसकर नाशिक जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार. हिरामण खोसकरांचे अजितदादांसोबत जवळचे संबंध आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीला हिंगोलीची जागा मिळावी म्हणून शरद पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चेत आले होते. म्हणूनच कधी इकडे तर कधी तिकडे असणारे आमदार हेच आहेत का याचा शोध घेतला गेला.
चौथा कोड होता एक नांदेडवाला. नांदेडवाला म्हटल्यावर आमदार जितेंद्र अंतापूरकर संशयाच्या भोवऱ्यात आले. जितेंद्र अंतापूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात.अशोक चव्हाण यांच्यानंतर अंतापूरकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती..
दरम्यान या आमदारांसाठी आम्ही ट्रॅप लावला होता. त्यात ते फसले असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या सर्वांची पक्षातून हाकालपट्टी केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.