माजी गृहमंत्री अनिल देशमुख ज्या मतदारसंघातून निवडून येतात, तो काटोल मतदारसंघ महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख हा या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहे. अनिल देशमुखांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा असून त्यांनी यामुळे आपले लक्ष्य नागपूर दक्षिण पश्चिमवर केंद्रीत केले होते. याच मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकर यांचा मुलगा याज्ञवल्क जिचकर याने फार पूर्वीपासून काँग्रेसतर्फे तयारी सुरू केली होती. ही जागा काँग्रेसला मिळावी असे जिचकर समर्थकांनी प्रयत्न सुरू केले होते.
नक्की वाचा : भाजपच्या पहिल्या यादीत आजी-माजी मंत्र्यांना संधी, लोकसभा हरलेल्यांनाही उमेदवारी?
महाविकास आघाडीमध्ये काटोलची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत बिलकुल नाहीये. असे झाल्यास याज्ञवल्क हे 'सांगली पॅटर्न' वापरून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पारंपरीक मतदारसंघ असतानाही शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघात परस्पर उमेदवार जाहीर करून टाकला होता. यामुळे काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. विशाल पाटील यांनी सांगली मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. तेव्हापासून सांगली पॅटर्न हा शब्द प्रचलित झाला आहे.
नक्की वाचा : जागा एक दावेदार दोन! बाप-लेकात रस्सीखेच, मागे कोण हटणार?
याज्ञवल्क यांनी दावा केला आहे की ते काटोल आणि आसपासच्या परिसरात 2008 पासून कामे करत आहेत. आपण अनेक रोजगार शिबिरे आयोजित केली असून यातून 6 हजारांपेक्षा अधिक युवकांना खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्याचा दावा याज्ञवल्क यांनी केला आहे. काटोल मतदारसंघाने अपक्ष उमेदवारांना साथ दिल्याचा इतिहास आहे. 1995 साली अनिल देशमुख हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी 1985 साली सुनील शिंदे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते, त्यांनी श्रीकांत जिचकर यांचा पराभव केला होता.