भारतीय क्रिकेट टीमनं ऑस्ट्रेलियन दौऱ्याची जोरदार सुरुवात केली आहे. टीम इंडियानं पर्थमध्ये झालेली पहिली टेस्ट 295 रननं जिंकत पाच टेस्टच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या सीरिजमधील दुसरी टेस्ट सहा डिसेंबरपासून अॅडलेडमध्ये होणार आहे. या टेस्टपूर्वी भारतीय टीम कॅनबेरामध्ये दोन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Australia's Prime Minister Anthony Albanese) यांची भेट घेतली. या भेटीच्या दरम्यान ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना विराट कोहलीनं दिलेलं उत्तर चांगलंच व्हायरल झालंय.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी या चर्चेच्या दरम्यान पर्थमध्ये केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. अल्बानीज यांनी विराट कोहलीशी खास संवाद साधला. 'पर्थमध्ये तू चांगला वेळ घालवलास. आम्ही बॅकफुटवर होतो त्याचवेळी तू ती इनिंग खेळलीस, असं अल्बानीज म्हणाले. त्यावर विराटनं 'मला नेहमी त्यावर मसाला लावायला आवडतं,' असं उत्तर दिलं. विराटचं हे उत्तर ऐकूण अल्बानीज यांनाही हसू आवरलं नाही. त्यांनी भारत आहे, तर मसाला हवाच, असं सांगितलं. विराटचं उत्तर फॅन्समध्ये लोकप्रिय झालं आहे.
( नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच विराट कोहलीचे 'अच्छे दिन' परत येणार? दोघांमध्ये आहे जबरदस्त कनेक्शन! )
भारतीय टीम दुसऱ्या टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान एकादश विरुद्ध दोन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. शनिवारी हा सामना सुरु होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेडमध्ये डे-नाईट टेस्ट (पिंक बॉल) होणार आहे. गेल्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्या टेस्टमध्ये टीम इंडिया 36 रनवर ऑल आऊट झाली होती. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील टीम इंडियाची एका इनिंगमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
विराट कोहलीची सेंच्युरी
विराट कोहली ऑस्ट्रेलियन सीरिजपूर्वी खराब फॉर्ममध्ये होता. तो पर्थ टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्येही पाच रन काढून आऊट झाला. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये विराटनं दमदार कमबॅक करत सेंच्युरी झळकावली. या सेंच्युरीसह तो ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक टेस्ट सेंच्युरी करणारा भारतीय बनला आहे. विराटची ऑस्ट्रेलियातील ही सातवी सेंच्युरी आहे. त्यानं सचिन तेंडुलकरला (सहा सेंच्युरी) मागं टाकलंय.