Champions Trophy 2025 : पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या संघर्षानंतर अखेर तोडगा निघाला आहे. बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात अखेर सहमती झालीय. त्यानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड पद्धतीनं खेळली जाणार आहे.
या प्रकरणात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आयसीसीनं (ICC) या स्पर्धेच्या हायब्रिड मॉडेलला परवानगी दिलीय. त्यानुसार भारतीय टीम चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. तर या स्पर्धेतील उर्वरित सर्व सामने पाकिस्तानात होतील. भारत सरकारनं सुरक्षेच्या कारणामुळे टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर बीसीसीआयनं हायब्रिड मॉडेलची मागणी केली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ताठर भूमिकेमुळे याबाबत कोणताही तोडगा निघाला नव्हता. अखेर, या प्रकरणात बीसीसीआयची मागणी मान्य झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय निघाला तोडगा?
याबाबतच्या रिपोर्टनुसार, चॅम्पिन्स ट्रॉफीतील सामने पाकिस्तानमधील शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. पण, भारताचे सर्व सामने तसंच सेमी फायनल आणि फायनल दुबईत होतील.
भारतीय टीमनं स्पर्धेच्या सेमी फायनल आणि फायनलमध्ये प्रवेश केला तर हे सामने दुबईमध्ये खेळवले जातील. टीम इंडियाचं आव्हान त्यापूर्वीच संपुष्टात आलं, तर सेमी फायनल आणि फायनल पाकिस्तामध्येच खेळवली जाईल.
( नक्की वाचा : 'एक शब्दही बोलला नाही...' धोनीला कॅप्टनपदावरुन काढण्यावर गोयंकांनी सोडलं मौन )
भारताच्या सामन्यांचं यजमानपद भूषविण्याची संधी गमावल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही. त्याबदल्यात ICC च्या महिलांच्या एका स्पर्धेचं 2027 नंतर यजमानपद PCB ला मिळेल.
यापूर्वी भारतीय टीमनं पाकिस्तानचा दौरा केला नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डही 2026 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी भारतामध्ये टीम पाठवणार नसल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलं होतं. T20 वर्ल्ड कप 2026 भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवली जाणार आहे.
काय आहे स्पर्धेचं स्वरुप?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळली जाणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 टीम सहभागी होणार आहेत. त्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आलीय. प्रत्येक गटातील दोन टॉप टीम सेमी फायनलमध्ये दाखल होतील.
( नक्की वाचा : विनोद कांबळीची कारकिर्द सचिनसारखी बहरली का नाही? राहुल द्रविडनं सांगितलं होतं कारण, Video )
संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये महत्त्वाचा मानला जाणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना लाहोरमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव पीसीबीनं ठेवला होता. तो सामना आता दुबईमध्ये खेळवला जाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world