Chinnaswamy Stadium Stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या आयपीएल विजेतेपदाच्या सेलिब्रेशनला बुधवारी (4 जून 2025) गालबोट लागलं. बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले. या घटनेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व्यवस्थापन अडचणीत आले आहे.
आरसीबीच्या मॅनेजमेंटनं या चेंगराचेंगरीपूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्या पोस्टमुळे आरसीबी मॅनेजमेंट अडचणीत आलंय. त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (KSCA) च्या वरिष्ठ सदस्यांचाही या चौकशीत समावेश असेल, कारण सत्कार समारंभाच्या नियोजनातील त्यांची भूमिका आता बेंगळुरू पोलीस आणि दंडाधिकारी चौकशी समितीद्वारे तपासली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय होती पोस्ट?
आरसीबीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर 4 जून रोजी दुपारी 3:14 वाजता, एक पोस्ट करण्यात आली होती, ज्यात 'विजय परेड' निघणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. ही परेड संध्याकाळी 5 वाजता विधानसौध ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत सुरू होणार होती, त्यानंतर स्टेडियममध्ये सत्कार सोहळा आयोजित केला जाणार होता. या पोस्टमध्ये मोफत पाससाठी एक लिंक होती, ज्यात 'मर्यादित प्रवेश' असल्याची आणि चाहत्यांना पोलिसांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती केली होती.
'विजय मिरवणुकीनंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर जल्लोष होईल. आम्ही सर्व चाहत्यांना विनंती करतो की, पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, जेणेकरून प्रत्येकजण शांततेत रोड शोचा आनंद घेऊ शकेल. मोफत पास (मर्यादित प्रवेश) shop.royalchallengers.com वर उपलब्ध आहेत,' असे त्या पोस्टमध्ये म्हटले होते.
पोलिसांशी कोणतीही चर्चा न करता परस्पर विजयी मिरवणुकीची घोषणा या पोस्टमध्ये करण्यात आली होती. वास्तविक विजयी मिरवणुकीला परवानगी नसल्याचा पोलिसांनी त्यावेळही खुलासा केला होता.
( नक्की वाचा : बॉसच्या मागं लागून सुट्टी घेतली, लॅपटॉप टेबलवर ठेवून स्टेडियमकडे पळाली, विराटची जबरी फॅन परतलीच नाही! )
विधानसौधबाहेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल आरसीबी टीमचा सत्कार करणार होते, तर दुसरीकडे चिन्नास्वामी स्टेडियमवर समारंभ होता. यामुळे दोन ठिकाणी एकाच वेळी गर्दी जमल्याने नियोजनात गोंधळ निर्माण झाला.
विधानसौधबाहेर एक लाखांहून अधिक लोक जमा झाले होते, तर स्टेडियममधील अंदाजानुसार तीन लाखांहून अधिक गर्दी होती. बंगळुरू पोलिसांकडं आगोदरच मनुष्यबळ कमी होतं. त्यांनी सरकारी संकुलाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण कर्मचारी पुन्हा तैनात केले होते, त्यामुळे दोन्ही ठिकाणी पोलीस दल विभागले गेले. यामुळे समन्वय बिघडला, विशेषतः गेट क्रमांक 2, 2A, 6, 7, 16, 17, 18 आणि 21-येथे गर्दीच्या लाटांनी उपलब्ध पोलीस आणि स्टेडियम कर्मचाऱ्यांवर ताण वाढला. त्यानंतर पुढील अनर्थ घडला, अशी माहिती आहे.