Champions Trophy 2025 Controversy: चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन कसं होणार हा प्रश्न अद्याप कायम आहे. हा प्रश्न कायम असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आयसीसीनं (ICC) फटकारलं आहे. पाकिस्तानच्या अनधिकृतपणे ताब्यात आसलेल्या काश्मीरमध्ये (POK) चॅम्पिन्स ट्रॉफीचा दौरा रद्द करण्याचा आदेश आयसीसीनं दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील स्कर्दू, मुरी आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफी नेण्यास आयसीसीनं मनाई केली आहे.
पीसीबीनं 16 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचा देशभर दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. पण, हा दौरा पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाणार नाही, असे आदेश आयसीसीनं पीसीबीला दिले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डानं (बीसीसीआयनं) चॅम्पियन्स ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरमध्ये नेण्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आयसीसीनं हा आदेश दिला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ICC ची कार्यक्रमाला परवानगी नाही
याबाबतच्या मीडिया रिपोर्टनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानातील दौऱ्याला आयसीसीनं अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं हा कार्यक्रम जाहीर केला होता. पीसीबीनं गुरुवारी सोशल मीडिया नेटवर्कवर हा दौरा जाहीर केला. त्यानुसार हा दौरा 16 नोव्हेंबर रोजी इस्लमाबादमध्ये सुरु होणार होता. त्यानंतर तो स्कर्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद या शहरांचा या दौऱ्य़ात समावेश होता.
यंदा पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा होण्यापूर्वीच ट्रॉफीचा देशव्यापी दौरा जाहीर करण्यात आला होता. सामान्यत: आयसीसी स्पर्धेच्या चार महिने आधी या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं जातं.
( नक्की वाचा : Champions Trophy 2025 : ICC चा प्लॅन तयार, पाकिस्ताननं हेका सोडला नाही तर 'या' देशात होणार स्पर्धा! )
भारताचा पाकिस्तान दौऱ्यास नकार
भारताकडून या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही, असं कळवण्यात आलं आहे. त्यानंतर ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात यावं यासाठी ब्रॉडकास्टर्स आयसीसीवर दबाव टाकत आहेत, अशी बातमी गुरुवारी उघड झाली होती.
भारत सरकारनं परवानगी नाकारल्यानंतर आपण पाकिस्तानचा दौरा करणार नाही, असं बीसीसीआयनं आयसीसीला कळवलं आहे. या स्पर्धेचं आयोजन हायब्रीड मॉडेलनं करण्यात यावी अशी बीसीसीआयची इच्छा आहे. त्यानुसार भारताचे सामने पाकिस्तानच्या बाहेर दुबईमध्ये व्हावे. तसंच फायनलही दुबईमध्ये खेळली जावी.
पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हा प्रस्ताव मान्य नाही. याबाबतच्या वृत्तानुसार पीसीबीनं हेका सोडला नाही, तर आयसीसी पाकिस्तानचं यजमानपद रद्द करु शकतं. त्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार घालेल, असा इशारा पीसीबीनं दिला आहे.
पीसीबीनं या प्रकरणात कोर्टात जाण्याची तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेचं संपूर्ण यजमानपद मिळावं यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आग्रही आहे.