Divya Deshmukh : भारताची बुद्धीबळपटू, १९ वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर (IM) दिव्या देशमुखने फिडे महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारत इतिहास घडवला आहे. तिने उपांत्य फेरीत चीनच्या माजी विश्वविजेत्या टॅन झोंगयी हिला १.५-०.५ च्या फरकाने पराभूत करत हा पराक्रम गाजवला आहे. या विजयासह, फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी दिव्या देशमुख पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
या विजयामुळे दिव्याने २०२६ च्या महिला उमेदवारी स्पर्धेसाठी देखील पात्रता मिळवली आहे. दिव्याने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच प्रभावी कामगिरी केली आहे. तिने याआधी दुसऱ्या मानांकित चीनच्या झू जिनर आणि आपल्याच देशाची ग्रँडमास्टर डी. हरिका (D. Harika) यांचा पराभव करून अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास निश्चित केला.
(नक्की वाचा : Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालनं रचला इतिहास! 50 वर्षांनंतर 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय )
बाटुमी, जॉर्जिया येथे ५ जुलै ते २९ जुलै २०२५ या कालावधीत आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत दिव्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. अत्यंत आत्मविश्वासाने आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत तिने अनुभवी खेळाडूंनाही मात दिली. टॅन झोंगयीविरुद्धचा तिचा उपांत्य फेरीचा विजय हा तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मानला जात आहे. या विजयामुळे दिव्याला तिचा पहिला ग्रँडमास्टर नॉर्म मिळाला आहे.
दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी आणि चीनची लेई टिंगजी यांच्यात सामना सुरू असून, तो टाय-ब्रेकरमध्ये गेला आहे. या सामन्याचा निकाल लागल्यानंतर दिव्याचा अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी निश्चित होईल.
(नक्की वाचा- IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत ॲम्ब्युलन्सने मैदानाबाहेर, वाचा नेमकं काय घडलं? Video)
फिडे महिला विश्वचषक ही महिला बुद्धीबळातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेतून टॉप ३ खेळाडूंना २०२६ च्या उमेदवारी स्पर्धेत स्थान मिळते. जो महिला विश्वविजेतेपदाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. दिव्या देशमुखची ही ऐतिहासिक कामगिरी केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय बुद्धीबळासाठी एक अभिमानास्पद क्षण आहे आणि यामुळे भारतातील युवा बुद्धीबळपटूंना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.