Los Angeles Olympics : ऑलिम्पिस स्पर्धेमध्ये 128 वर्षांनंतर क्रिकेट परतणार आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत, आयोजकांनी बुधवारी मोठी घोषणा केली. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या आयोजकांनी या बहुराष्ट्रीय स्पर्धेत क्रिकेटसाठी संघ निश्चित केले आहेत. पुरुष आणि महिला दोन्ही गटात प्रत्येकी सहा संघ सहभागी होतील. हे सामने टी-20 स्वरूपात खेळवले जातील. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांसाठी सहा संघ स्पर्धा करतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा शेवटचा समावेश होता. त्यानंतर आता लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये सहा संघ टी-20 स्वरूपात खेळतील. एवढेच नाही तर आयोजकांनी संघातील खेळाडूंची कमाल संख्या देखील निश्चित केली आहे. एका संघात 15 खेळाडू असतील असे आयोजकांनी सांगितले आहे. पुरुष आणि महिला दोन्ही गटात जास्तीत जास्त 90 खेळाडूंचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. याचा अर्थ सहा संघांमध्ये जास्तीत जास्त 90 खेळाडू असतील.
ICC चे सध्या 12 नियमित आणि 94 सहयोगी सदस्य आहेत. नियमित सदस्यांमध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या देशांचे संघ आहेत. तथापि, 2028 च्या ऑलिम्पिकसाठी पात्रता प्रक्रिया अद्याप जाहीर झालेली नाही. अमेरिका यात सहभागी होईल हे निश्चित मानले जाते. कारण त्यांना यजमान कोट्याचा लाभ मिळेल. याचा अर्थ असा की अमेरिकेव्यतिरिक्त, आणखी पाच संघ सहभागी होऊ शकतील आणि त्यांना पात्रता प्रक्रियेतून जावे लागेल.
( नक्की वाचा : IPL 2025 : 2023 पासून सीएसकेच्या बँचवर आहे वर्ल्ड चॅम्पियन, कॅप्टन ऋतुराजची जागा घेणार? )
पाच नवीन खेळांचा समावेश
लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये ज्या पाच नवीन खेळांना स्थान देण्यात आले आहे त्यात क्रिकेटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2023 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसह बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश यांचा समावेश आहे. दरम्यान, आयओसी कार्यकारी मंडळाने बुधवारी 2028 च्या ऑलिम्पिक खेळांसाठी स्पर्धा वेळापत्रक आणि खेळाडूंच्या कोट्याला मान्यता दिली. या खेळांमध्ये 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकपेक्षा 22 पदक स्पर्धा जास्त असतील.
आयओसीने 2028 च्या ऑलिम्पिकसाठी विक्रमी 351 पदक स्पर्धांना मान्यता दिली आहे. परंतु खेळाडूंची संख्या 10500राहील. खेळाडूंच्या संख्येत नवीन खेळांचे 698 खेळाडू देखील समाविष्ट आहेत. ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात प्रथमच, सांघिक खेळांमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंची संख्या समान असेल. इतर खेळांप्रमाणे, बॉक्सिंगमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांच्या गटातही सात वजन गट असतील.