जाहिरात

IPL 2025 : 2023 पासून सीएसकेच्या बँचवर आहे वर्ल्ड चॅम्पियन, कॅप्टन ऋतुराजची जागा घेणार?

IPL 2025 : 2023 पासून सीएसकेच्या बँचवर आहे वर्ल्ड चॅम्पियन, कॅप्टन ऋतुराजची जागा घेणार?
मुंबई:

आयपीएल 2025 मधील पहिल्या पाचपैकी चार मॅच गमावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मोठा धक्का बसला आहे. सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर झाला आहे. ऋतुराजच्या अनुपस्थितीमध्ये महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) सीएसकेचं नेतृत्त्व करेल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण घेणार ऋतुराजची जागा?

ऋतुराजच्या जागी कॅप्टन म्हणून अनुभवी महेंद्रसिंह धोनी हा सीएसकेकडं पर्याय होता. सीएसकेनं धोनीच्या कॅप्टन्सीमध्येच पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळालं होतं. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा टीमचा कॅप्टन बनल्यानं सीएसकेच्या नेतृत्त्वाची फारशी अडचण होणार नाही.

पण, ऋतुराज गायकवाड एक बॅटर म्हणून देखील सीएसकेचा महत्त्वाचा खेळाडू होता. ऋतुराजनं यापूर्वी सीएसकेच्या दोन आयपीएल विजेतेपदामध्ये बॅटिंगनं भक्कम योगदान दिलं होतं. त्यामधील एका सिझनमध्ये तर त्यानं सर्वात जास्त रन काढत ऑरेंज कॅप देखील पटकावली होती. या सिझनमधील पहिल्या पाच सामन्यात त्यानं दोन हाफ सेंच्युरीसह 122 रन केले आहेत. यापूर्वी ओपनिंगला येणारा ऋतुराज टीमची गरज म्हणून या सिझनमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता. 

IPL 2025 : CSK ला मोठा धक्का, कॅप्टन ऋतुराज स्पर्धेतून बाहेर, धोनी पुन्हा कॅप्टन

( नक्की वाचा : IPL 2025 : CSK ला मोठा धक्का, कॅप्टन ऋतुराज स्पर्धेतून बाहेर, धोनी पुन्हा कॅप्टन )

ऋतुराजच्या अनुपस्थितीमध्ये त्याचा पुणेकर सहकारी राहुल त्रिपाठी हा पर्याय सीएसकेकडं आहे. त्रिपाठीला आयपीएलमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याला यंदा 3.40 कोटीमध्ये सीएसकेनं खरेदी केलंय. राहुल हा ऋतुराजप्रमाणेच ओपनिंगला तसंच तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करु शकतो.

पण, राहुलचा या सिझनमधील फॉर्म साधारण आहे. त्यानं 3 सामन्यात 10 च्या सरासरीनं फक्त 30 रन काढले आहेत. तीन पैकी दोन सामन्यात त्याला दोन अंकी धावसंख्या देखील करण्यात अपयश आलं होतं. या खराब कामगिरीमुळेच त्याला मागील दोन सामन्यात त्याला वगळण्यात आलं होतं.

IPL 2025 : एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणाऱ्या बॉलरला CSK कधी घेणार? बेंचवर बसलाय यॉर्कर किंग

( नक्की वाचा :  IPL 2025 : एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणाऱ्या बॉलरला CSK कधी घेणार? बेंचवर बसलाय यॉर्कर किंग )

त्यामुळे खराब कामगिरीमुळे टीममधून वगळण्यात आलेल्या राहुल त्रिपाठीच्या जागी 2023 पासून सीएसकेकडं असलेल्या शेख रशिदचा (Shaik Rasheed) विचार देखील सीएसके मॅनेजमेंट करु शकतो.

वर्ल्ड चॅम्पियन

सीएसकेनं पहिल्या पाच मॅचमध्ये 17 खेळाडूंना संधी दिली आहे. पण, आंध्र प्रदेशातील गुटुंर जिल्ह्यातल्या शेख रशिदला अद्याप संधीची प्रतीक्षा आहे. यश ढूलच्या नेतृत्त्वामध्ये अंडर 19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा शेख रशिद सदस्य होता. तो मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग करु शकतो. त्याच्या याच कौशल्यामुळे त्याला 2023 साली सीएसकेनं पहिल्यांदा खरेदी केलं होतं.

रशिदनं अंडर 19 वर्ल्ड कपमधील 4 इनिंगमध्ये 2 हाफ सेंच्युरीसह 201 रन केले होते. तो त्या टीमचा व्हाईस कॅप्टन होता. त्या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये त्यानं यश ढुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 204 रनची पार्टनरशिप केली होती.

आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध फिल्डिंग करताना रशिदनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. रशिदनं त्या मॅचमध्ये जितेश राणाचा जबरदस्त कॅच पकडला होता. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये रशिदला पुन्हा एकदा सीएसकेनं खरेदी केलं. पण, त्याला अद्याप एकदाही खेळायची संधी मिळालेली नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये शेख रशिदनं 19 फर्स्ट क्लास मॅचमधील 33 इनिंगमध्ये 37.62 च्या सरासरीनं 1204 रन काढले आहेत. यामध्ये 2 सेंच्युरी आणि 7 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. त्यानं लिस्ट A गटातील 12 मॅचमध्ये 128 रन काढले आहेत. तर टी20 मधील 17 मॅचमध्ये 352 रन काढले आहेत. यामध्ये एक सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.

2023 पासून रशिदला एकदाही सीएसकेकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. आता ऋतुराज स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: