आयपीएलच्या नवीन हंगामात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवलेलं चाहत्यांना रुचलेलं दिसत नाहीये. प्रत्येक सामन्यात मैदानात आणि सोशल मीडियावर चाहते हार्दिक पांड्याला ट्रोल करताना दिसत आहेत.
आयपीएलच्या नवीन हंगामात मुंबई इंडियन्सने आपल्या संघाची सूत्र रोहित शर्माच्या हातातून काढून घेत हार्दिक पांड्याकडे सोपवली. हंगामाला सुरुवात होण्याआधी झालेल्या डीलमध्ये मुंबईने गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला संघात घेत त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं. भविष्याच्या दृष्टीने संघाने हा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण व्यवस्थापनातर्फे दिलं जात असलं तरीही चाहत्यांना मात्र हा निर्णय रुचलेला नाही. आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात मुंबई इंडियन्सच्या पदरी पराभव आला असून मैदानात, सोशल मीडियावर चाहते हार्दिकचं ट्रोलिंग करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर सौरव गांगुली हा हार्दिक पांड्यासाठी धावून आला आहे. चाहत्यांनी हार्दिकचं ट्रोलिंग करु नये, हे चूक आहे असं विधान गांगुलीने केलं आहे.
सौरव गांगुली
हार्दिक पांड्याचं कौतुक करत असताना यावेळी सौरव गांगुलीने रोहित शर्माचीही स्तुती केली. "रोहित हा शर्मा हा एक वेगळाच खेळाडू आहे. मुंबईसाठी आणि भारतीय संघासाठी कर्णधार म्हणून त्याची कामगिरी ही एका वेगळ्याच दर्जावर आहे."
अवश्य वाचा - IPL 2024 : वर्ल्ड चॅम्पियन Pat Cummins ला वाटतेय 'या' खेळाडूची भीती
मैदानातही हार्दिकची प्रेक्षकांनी उडवली हुर्यो -
चाहत्यांचा रोष हा सोशल मीडियापर्यंत राहील असं वाटत असताना प्रत्यक्ष मैदानातही हार्दिक पांड्याची चाहत्यांनी हुर्यो उडवली. यात सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे मुंबईचा संघ वानखेडे मैदानावर खेळत असतानाच नाणेफेकीदरम्यान चाहत्यांनी हार्दिकची टर उडवली. यावेळी नाणेफेकीला आलेल्या संजय मांजरेकरांना उपस्थित चाहत्यांना समज द्यावी लागली होती.
अवश्य वाचा - T-20 वर्ल्डकपसाठी शिवम दुबे हा भारतीय संघात हवाच - युवराज सिंग
मुंबईचा संघ जेव्हा जेव्हा मैदानात येत आहे तेव्हा चाहते हे रोहित शर्मा मैदानात दिसल्यावर आपला आनंद व्यक्त करत आहेत. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याने केलेल्या कॅप्टन्सीवरुनही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. रोहितकडे कर्णधारपद सोपवल्यामुळे चाहते नाराज असल्याबद्दल विचारलं असता हार्दिकने चाहत्यांच्या भावना आपल्याला मान्य असल्याचं म्हटलं होतं. सलगचे तीन पराभव आणि चाहत्यांचं ट्रोलिंग या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याने काही दिवसांपूर्वीच गुजरात येथील सोमनाथ मंदीराला भेट दिली. पहिल्या तिन्ही सामन्यांत पराभूत झालेल्या हार्दिकसमोर रविवारी दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान असणार आहे.