सध्या भारतात आयपीएलच्या सतराव्या सिझनची धुम सुरु आहे. आयपीएलचा हंगाम संपला की भारतीय संघासमोर T-20 वर्ल्डकपचं आव्हान असणार आहे. जुन महिन्यात ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत भरवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात शिवम दुबेला स्थान मिळायलाच हवं असं विधान भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने केलं आहे. मुळचा मुंबईकर असलेला शिवम दुबे हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळतो. आक्रमक डावखुरी फलंदाजी आणि मधल्या फळीत गोलंदाजी करण्याची चांगली क्षमता शिवम दुबेकडे आहे.
IPL मध्ये शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्जला सनराईजर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला. यात शिवम दुबेने केलेल्या 24 बॉल 45 धावांच्या खेळीमुळे चेन्नईचा संघ १६५ धावांपर्यंत मजल मारु शकला. या सामन्यात हैदराबादकडून अभिषेक शर्मानेही आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली. परंतु शिवम दुबेने केलेल्या फटकेबाजीचं युवराज सिंगने कौतुक केलं. आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात शिवम दुबेला स्थान मिळायला हवं असं युवराज म्हणाला.
काय म्हणाला युवराज सिंग?
आपल्या X अकाऊंटवर युवराज सिंगने शिवम दुबेचं कौतुक केलं. आपल्या ट्विटमध्ये युवराज म्हणतो, ज्या सहजतेने शिवम दुबे बॉल बाऊंड्री लाईन बाहेर पाठवत होता ते पाहून खूप आनंद झाला. त्याला वर्ल्डकप संघात स्थान मिळायला हवं असं मला वाटतं. गेमचेंजर ठरु शकेल असे स्किल्स त्याच्याकडे आहेत.
Good to watch @IamShivamDube clearing the field with ease !! I feel he has to be in the World Cup squad . Has got the skill to be the #gamechanger #CSKvsSRH #IPLT20
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) April 5, 2024
सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यातक शिवम दुबेला चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने संयमी खेळी करत चांगली साथ दिली. नवीन वर्षात भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध तीन T-20 सामन्यांची मालिका खेळला. या मालिकेतही शिवम दुबेने आपल्या फलंदाजीची चमक दाखवत निवड समितीला आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. त्यामुळे आगामी आयपीएल सामन्यांमध्ये शिवम दुबेची कामगिरी कशी होते आणि त्याला खरंच वर्ल्डकप संघात स्थान मिळतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा - पृथ्वी शॉ च्या अडचणी वाढल्या, विनयभंगाच्या आरोपांची चौकशी होणार; कोर्टाचे आदेश
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world