फिफा वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनकडून मिळालेल्या पराभवानंतर अर्जेंटिनामध्ये संतापाचा उद्रेक झाला असून देशात ठिकठिकाणी दंगल उसळली आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेसी आपला शेवटचा वर्ल्ड कप खेळत होता, मात्र सलग दुसऱ्यांदा त्याचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले. या पराभवाचा धक्का सहन न झाल्याने अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्समधील प्रसिद्ध 'ओबेलिस्क' स्मारकाजवळ हजारो फुटबॉल चाहते आणि पोलीस यांच्यात हिंसक चकमक झाली आहे.
उग्र रूप धारण केलेल्या गर्दीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलिसांना ढालींचा वापर करावा लागला. या भागात आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये पोलीस कर्मचारी जमिनीवर पडलेल्या चाहत्यांवर लाठीमार करतानाही दिसत आहेत.
मैदानातही स्पेन आणि अर्जेंटिनाच्या खेळाडूंमध्ये हाणामारी
स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून फिफा वर्ल्ड कप 2026 च्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. मात्र, सामना संपल्याची अंतिम शिटी वाजताच दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावरच एकमेकांशी भिडले. अर्जेंटिनाचा मिडफील्डर लिएंड्रो पेरेडेस पराभवानंतर स्वतःवरील ताबा गमावून बसला आणि त्याने स्पेनच्या खेळाडूंना मारहाण करण्यास सुरुवात केली.
(नक्की वाचा- Salman Khan Health: सलमान खानला झालंय तरी काय? 5 फोटो शेअर करत चिंतेत असलेल्या फॅन्सना दिलं उत्तर)
तसेच, अर्जेंटिनाचा डिफेंडर नहुएल मोलिना याने स्पेनच्या एका खेळाडूच्या पोटात ठोसा मारला. पेरेडेसने स्पेनच्या एरिक गार्सियाचा गळा पकडून त्याला जोरात धक्का दिला, ज्यानंतर अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक स्कालोनी यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
पेरेडेसची गुंडगिरी; गावीला पाडले जमिनीवर
गार्सियासोबत झालेल्या वादाव्यतिरिक्त, पेरेडेसने स्पेनच्या 21 वर्षीय बार्सिलोना मिडफील्डर गावी (Gavi) याला थेट जमिनीवर पाडले आणि त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवून त्याला ढकलून दिले. एवढेच नव्हे तर पेरेडेसने गावीच्या दिशेने आपला बूट मारल्याचेही स्पष्ट दिसले. याच दरम्यान, मोलिनाने स्पेनचा कर्णधार रोड्री याच्यावर हात उचलवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे संतप्त झालेल्या रोड्रीने मोलिनाला जाब विचारला.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ; चिंता मात्र कायम?)
विजेतेपद सोहळ्यावेळी अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी फिरवली पाठ
या मैदानानावरील राड्यानंतर अर्जेंटिनाच्या संघाने आणखी एक अत्यंत लाजीरवाणी आणि क्रीडा जगताला काळिमा फासणारी कृती केली. जेव्हा विश्वविजेता ठरलेला स्पेनचा संघ आपले वर्ल्ड कप मेडल स्वीकारत होता, तेव्हा अर्जेंटिनाचे सर्व खेळाडू त्यांच्याकडे पाठ करून उभे राहिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world